Dharashiv ZP Election Result : सर्वांनाच जोमाने कामाला लागण्याचा मतदारांचा संदेश

धाराशिवमध्ये बलाढ्य पक्षालाही स्पष्ट बहुमत नाही
Dharashiv ZP Election Result
Political PartiesPudhari
Published on
Updated on

भीमाशंकर वाघमारे

धाराशिव : सत्तेचे राजकारण बहुमताच्या आकड्याभोवती फिरत असते. ती ‌‘मॅजिक फिगर‌’ गाठली की सत्तेची गादी मिळते. आता जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी झाली आहे. यात केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेला भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. या पक्षाला 19 जागा मिळाल्या. तर गावोगावी संघटन असलेल्या ठाकरे यांच्या शिवसेनेला अवघ्या 7 जागांवर समाधान मानावे लागले. कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या काँग्रेसने कशाबशा 3 जागा मिळवल्या. तर शरद पवारांची राष्ट्रवादी पूर्णतः अपयशी ठरली.

या सर्व बाबींचा विचार करता ताकद व मजबूत संघटन असूनही मतदारांनी या पक्षांना पूर्ण बहुमत दिलेले नाही. याचा अर्थ म्हणजेच सर्वच पक्षांना जनतेने ‌‘जोमाने कामाला लागा‌’ हाच संदेश दिल्याचे स्पष्ट होत आहे.भारतीय जनता पक्षात गेल्या पाच ते सात वर्षांत मोठ्या नेत्यांचे प्रवेश झाल्याने साहजिकच हा पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत येईल, अशी त्या पक्षाला खात्री होती. प्रत्यक्षात या पक्षाच्या कामगिरीचा आठ तालुक्यांचा आढावा घेतला तर तुळजापूर, कळंब आणि धाराशिव या तीन तालुक्यांतच या पक्षाने जोरदार कामगिरी केल्याचे स्पष्ट होते.

Dharashiv ZP Election Result
Parli Thermal Power Plant : परळी औष्णिक वीज केंद्र सीपीसीबीच्या रडारवर

या पक्षाला मिळालेल्या 19 पैकी 16 जागा तुळजापूर, धाराशिव, कळंब या तीन तालुक्यांतूनच मिळाल्या आहेत. उर्वरित पाच तालुक्यांतील उमरगा तालुका वगळता भूम, परंडा, वाशी, लोहारा या तालुक्यांत पक्षाची कामगिरी समाधानकारक नसल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे. त्यामुळे या जागा आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या करिश्म्यावर आल्या, हे स्पष्ट आहे. यात भाजप म्हणून पक्षाचे योगदान किती, हा प्रश्नही उरतोच.

शिवसेनेच्या (ठाकरे) बाबतीत तर पक्षाने आत्मचिंतन करायला हवे, असे निकाल आले आहेत. एक खासदार व दोन आमदार असूनही केवळ सात जागा पदरात पडल्या आहेत. पालिका निवडणुकीतही या पक्षाला कामगिरी दाखवता आली नाही. जिल्हा परिषदेतही तसेच चित्र समोर आले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जोरदार कामगिरी झाल्याने कदाचित कार्यकर्ते निवांत राहिले असावेत. नेत्यांचीही काही गणिते चुकली असावीत. अनेक वर्षे सत्ता नसल्याने कार्यकर्ते सांभाळताना कसरत करावी लागली, हे खरे असले तरी कार्यकर्त्यांचे जाळे गावोगावी असतानाही केवळ 7 जागांवर मशाल थांबली. त्यामुळे लोकसभेला आता केवळ तीन वर्षांचा अवधी असताना हा पक्ष पुढे काय रणनीती आखतो, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.शिंदे यांच्या शिवसेनेला 15 जागा मिळाल्या असल्या तरी या पक्षाचे ‌‘लक‌’ कामी आले आहे.

हा एकमेव पक्ष आहे, ज्याने प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी जागा मिळवली आहे. या पक्षात नेत्यांची गटबाजी निवडणुकीपूर्वीच समोर आली होती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चिंता असतानाही या पक्षाला यश मिळाले आहे. यात सर्वात मोठा वाटा आ. तानाजी सावंत यांचा आहे. त्यांच्या भूम, परंडा व वाशी या तालुक्यांतून त्यांनी आठ जागा मिळवल्या आहेत, त्या देखील भाजपसोबत युती न करता. उर्वरित जागा लोहारा व कळंबमधून प्रत्येकी दोन, तर धाराशिव, उमरगा व तुळजापुरातून प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

गटबाजी उफाळून आलेली असतानाही या पक्षाला मिळालेले यश उल्लेखनीय आहे.त्यानंतर राष्ट्रवादीने (अ.प.) 6 जागा मिळवल्या असल्या तरी निवडून आलेल्या नेत्यांचा वैयक्तिक करिश्मा त्यामागे आहे. माजी आ. राहुल मोटे यांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रातून तीन जागा विजयी केल्या. पक्षांतराचा सर्वात मोठा फटका या पक्षासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसल्याचे दिसते. थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीने पूर्वी येथे सत्तेचे वैभव अनुभवलेले असतानाही यंदा मात्र या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. नेते असूनही त्यांना आपल्या उमेदवारांना विजयापर्यंत नेता आले नाही.काँग्रेस पक्षाने मात्र या निवडणुकीत संधी असूनही चांगली कामगिरी केली नसल्याचे दिसते. मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी असूनही हा पक्ष हाराकिरी करीत असल्याचा आरोप या पक्षाचे कार्यकर्तेच करु लागले आहेत.

नगर पालिका निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषदेतही या पक्षाने निराशाजनक कामगिरी केली. केवळ उमरगा व तुळजापुरात एकूण 3 जागा मिळाल्या आहेत. उर्वरीत आठही तालुक्यात कामगिरी सुमार झाली. उमरगा व परंडा तालुक्यांत मात्र राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मात देत चार अपक्ष विजयी झाले आहेत. परंडा तालुक्यात धनंजय सावंत हे भाजपच्या पाठिंब्यावर जवळा गटातून विजयी झाले आहेत. तर लोणी, तुरोरी व आलूर गटातही अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. लोणी गटातील उमेदवार ठाकरे शिवसेनेच्या पाठिंब्यावर रिंगणात होता.

Dharashiv ZP Election Result
Sand mafia attack on teacher : वाळु माफीयांचा शिक्षकावर हल्ला

एकूणच 55 जिल्हा परिषद गट असलेल्या या जिल्ह्यात भाजपने 19, शिवसेनेने 15 तर राष्ट्रवादीने 6 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे यांना महायुती म्हणूनच सत्तेत येणे भाग आहे. तर प्रमुख विरोधी पक्षाची जबाबदारी आता ठाकरे सेनेला पार पाडावी लागणार आहे. त्यांना समाजवादी पक्षाच्या एका सदस्याचीही साथ मिळेल, अशी चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news