Dharashiv News | उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील शीतगृह सुविधा तातडीने सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

‘दै. पुढारी’च्या वृत्तानंतर प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Umarga Sub District Hospital
Umarga Sub District Hospital Pudhari
Published on
Updated on

Umarga Sub District Hospital

उमरगा : उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागासाठी आवश्यक असलेली शीतगृह (फ्रीजर) सुविधा गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने मृतांच्या नातेवाईकांना मोठ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही गंभीर समस्या तातडीने सोडवून शीतगृह सेवा सुरू करावी, तसेच यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने सोमवारी (दि. १५) निवेदनाद्वारे करण्यात आली.

उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे आरोग्यमंत्री यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील महत्त्वाचे शहर असलेल्या उमरगा तसेच लोहारा आणि परिसरातील लाखो नागरिकांसाठी येथील उपजिल्हा रुग्णालय हे प्रमुख आरोग्य केंद्र आहे. अपघाती, संशयास्पद तसेच विविध कायदेशीर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रकरणांमध्ये शवविच्छेदनासाठी या रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते.

Umarga Sub District Hospital
Dharashiv News : उमरगा उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड! दीड वर्षापासून शवागृहातील शीतगृह बंद

मात्र, मृतदेह जतन करण्यासाठी आवश्यक असलेली शीतगृह सुविधा गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा दूरवरून येणाऱ्या नातेवाईकांची प्रतीक्षा किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवणे कठीण होत असल्याने मृतांच्या सन्मानालाही बाधा पोहोचत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

फाउंडेशनने शीतगृह सुविधा तात्काळ सुरू करण्याबरोबरच अत्याधुनिक आणि कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. तसेच ही सुविधा दीर्घकाळ बंद राहण्यामागील कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शवविच्छेदन विभागाचे तांत्रिक व प्रशासकीय लेखापरीक्षण करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Umarga Sub District Hospital
Dharashiv News : शहराला आठ दिवसांनी पाणी; गळतीतून रोज हजारो लिटर वाया

दरम्यान, या मागण्यांवर १५ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही न झाल्यास उपविभागीय कार्यालय आणि उपजिल्हा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. निवेदनावर ॲड. शीतल चव्हाण, सत्यनारायण जाधव, ॲड. खाजा शेख, व्यंकट भालेराव, करिम शेख, धानय्या स्वामी, किशोर बसगुंडे, कविता साळी, किशोर औरादे, बबीता मदने, संतोष चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

‘दै. पुढारी’च्या वृत्तानंतर प्रश्न पुन्हा चर्चेत

उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेली शीतगृह सुविधा तब्बल दीड वर्षांपासून बंद असल्याचा गंभीर प्रकार ‘दै. पुढारी’ने दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आणला होता. “उपजिल्हा रुग्णालयातील फ्रिजर दीड वर्षांपासून बंद; रुग्णालय प्रशासनावर खाजगी फ्रिजरची व्यवस्था करण्याची नामुष्की” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला. या वृत्तातून मृतदेह जतन करण्यासाठी प्रशासनाला खाजगी फ्रिजरची मदत घ्यावी लागत असल्याचे वास्तव समोर आले होते.

Umarga Sub District Hospital
Dharashiv News : शाळा, घरांवरील पत्रे उडाले; वाशी तालुक्यात मोठे नुकसान

सर्वपक्षीयांना ‘दै. पुढारी’चा परखड सवाल

उमरगा हे जिल्ह्यातील राजकीय हालचालींचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. सत्ताधारी, विरोधक, लोकप्रतिनिधी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी येथे सक्रिय असताना, दीड वर्षांपासून बंद असलेली शीतगृह सुविधा आणि त्यामुळे मृतदेहांची होणारी विटंबना त्यांच्या नजरेस कशी पडली नाही, असा परखड सवाल ‘दै. पुढारी’ने उपस्थित केला होता.

विकासकामे, निधी मंजुरी आणि श्रेयवादाच्या राजकारणात व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. ‘दै. पुढारी’च्या वृत्तानंतर हा विषय अधिक तीव्रतेने चर्चेत आला असून, आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news