

शंकर बिराजदार
उमरगा : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. जिवंत रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी कायम असतानाच आता मृत्यूनंतरही सन्मान मिळत नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. तब्बल दीड वर्षापासून शवागृहातील शीतगृह बंद असल्याने अक्षरशः खाजगी फ्रिजरची व्यवस्था करण्याची नामुष्की ओढवली आहे.
पुणे हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा हे राज्याच्या सीमेवर आहे. महामार्ग व ईतर अपघातातील जखमींवर वेळत उपचार व्हावे म्हणून सर्व सुविधा युक्त शंभर खाटाचे उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर आहे. तालुक्यासह परराज्यातील हजारो रुग्णावर उपचार तसेच वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येते. एखाद्या घटनेतील अनोळखी मृतदेहाची ओळख पटेपर्यत मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयात वातानुकूलित शवागृह आहे. यात चार मृतदेह ठेवण्याची सुविधा आहे. मुळज (ता उमरगा) येथे शनिवारी विहिरीत सापडलेल्या एका ३५ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मात्र मृताची ओळख पटेपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेले शीतगृहच बंद असल्याने पोलिसांसह प्रशासनाची मोठी अडचण झाली. अखेर खाजगी फ्रिजरची व्यवस्था करण्याची नामुष्की ओढवली. विशेष म्हणजे, शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या या सुसज्ज रुग्णालयात शवागृह आणि शीतगृहाची सुविधा उपलब्ध असूनही ती कार्यान्वित ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. मृतदेहांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक असलेली यंत्रणा बंद पडून दीड वर्ष उलटूनही ती दुरुस्त करण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
आढावा बैठक फक्त घोषणेतच?
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर आमदार प्रवीण स्वामी यांनी दर महिन्याला आढावा बैठक घेण्याची घोषणा केली होती. महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागासोबत समन्वय साधून सुविधा सुधारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजही रुग्णांना त्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. आढावा बैठका झाल्या का, झाल्या असतील तर सुधारणा कुठे आहेत, आमदारांना बैठकीचा विसर तर पडला नाही असे अनेक प्रश्न नागरिकांतून उपस्थित केले जात आहेत.