

City gets water once every eight days; thousands of litres wasted daily due to leakage
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : यंदा कमी पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य शासनानेही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले असले, तरी त्याचा परिणाम धाराशिव शहरात दिसून येत नाही. बायपास रोडलगत पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनला गळती लागून महिना झाला, तरी त्याकडे पालिकेचे किंवा संबंधित यंत्रणांचे लक्ष नाही. शहराला आठ दिवसांतून एकदा पाणी येत असूनही या पाइपलाइनमधून मात्र दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे वास्तव आहे. तेरणा रुईभर 'डब्ल्यूटीपी'वरून फिल्टरकडे जाणाऱ्या पाइपलाइनला ही गळती लागली आहे.
महिनाभरापूर्वी या परिसरातील काही शेतकऱ्यांनी शेतीची बांधबंदिस्ती केली. त्यानंतर पाइपलाइनला गळती लागल्याचा प्रकार समोर आला. वरुडा चौक ते तेरणा फिल्टर या राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडलगत दररोज हे पाणी वाहून जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या हा प्रकार अजून निदर्शनास न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
किंग्ज गार्डन हॉटेलच्या समोरच्या बाजूला ही गळती आहे. महत्त्वाची व मोठी पाइपलाइन असतानाही या मार्गावर पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी लक्ष देत नसल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे. वास्तविक, साधारण वर्षभरापासून शहराला पालिकेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एकदाच होत आहे. 'एल निनों'च्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचे प्रमाण असल्याने पालिकांसह सर्व शासनासह यंत्रणांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे निर्देश राज्य जिल्हाधिकाऱ्यांनीही सर्व घटकांना दिलेले आहेत. असे असताना धाराशिव पालिकेची यंत्रणा याबाबत अजून जागरूक नसल्याचे स्पष्ट होत आहे.