

Dharashiv Pickup Crash
भूम : भूम ते बार्शी रस्त्यावर देवंग्रा गावाजवळ सोमवारी (दि. २३ जून) सकाळी साडेसातच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. चिखर्डे (ता. बार्शी) येथून मयत पाहुण्याची राख सावडण्यासाठी निघालेली पिकअप गाडी (क्रमांक एमएच २५ ए जे ४३४८) (लहान टेम्पो) अचानक पलटी झाली. या अपघातात ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला हावई देविदास तुपेरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात घडल्यानंतर जवळील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना बाहेर काढत तातडीने पोलीस व रुग्णवाहिकेला माहिती दिली. जखमींना उपचारासाठी बार्शी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातात लहान मुलांचाही समावेश असून जखमींमध्ये हनुमंत मधूकर तुपेरे, रामभाऊ लांडगे, हरीभाऊ भिमराव रामगुडे, शामभाऊ लांडगे, सुरेखा सुभाष तुपेरे, अनिता सतीश तुपेरे, विद्या बबलू लंकेश्वर, संगीता हनुमंत तुपेरे (सर्व रा. चिखर्डे, ता. बार्शी) यांचा समावेश आहे.
मृत महिलेवर माणकेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर चिखर्डे येथे दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात पोहोचवले. घटनेची माहिती मिळताच परांडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर, पो. ह. एस. डी. घोळवे, पो. ना. बी. आर. काकडे, पो. ना. स्वामी, पो. का. एस. एम. कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. पुढील तपास पोलीस नाईक बी. आर. काकडे करत आहेत.