

30.75 percent sowing in Umarga taluka
उमरगा, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात अनेक वर्षांनंतर प्रथमच यावर्षी बिगर मोसमी पावसाने महिनाभरात चांगलेच झोडपून काढले. रोहिणी नक्षत्रात शेवटी आणि मृग नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. आतापर्यंत ३०. ७५ टक्के खरीप पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक १३ हजार १३१ हेक्टरवर सोयाबीन व ईतर गळीत पिकाची पेरणी झाली आहे.
तालुक्यात एक जून ते गुरुवार, (दि १९) पर्यंत जून महिन्याची पावसाची सरासरी ११०.७ मिलिमीटर आहे. आता पर्यंत १०४.२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. पाच मंडळ विभागात सर्वाधिक पाऊस झाला आहे. रोहिणी नक्षत्रातील शेवटी आणि मृग नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसाच्या भरवशावर तालुक्यातील खरीप ७५ हजार ४१६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी २३ हजार १९२ हेक्टर क्षेत्रात ३०.७५ टक्के पेरणी झाली आहे. यात खरीप, ज्वारी, बाजरी, मका, साळ २४१ हेक्टर, तूर, मूग, उडीद ९ हजार ७५६ हेक्टर तर सोयाबिन व इतर गळित पिकाचा १३ हजार १३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास पिके निरोगी व जोमाने येतात शिवाय उत्पन्नात ही वाढ होण्याची अशा असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद व तूर पेरणीला प्राधान्य दिले आहे. तर दुसरीकडे गेल्या आठवड्यात पेरणी केलेली पिकांची उगवण होवून चांगली वाढ झाली आहे.
तर बहुतांश शेतकरी पेरणी साहित्याची खरेदी करत आहेत. खरीप हंगामातील सर्व क्षेत्रावर पेरणी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या नक्षत्राकडून पाऊस होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने खरिपाची पेरणी सुरू केली आहे. काही ठिकाणी मोजकेच शेतकरी बैल जोडीच्या साहाय्याने पेरणी करत असल्याचे दिसून येत आहेत.
तालुक्यात मागील हंगामात शेतकऱ्यांना पिके काढणीच्या दरम्यान अतिवृष्टीमुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी यामुळे पिकांचे उत्पादन प्रचंड घटले. यामुळे पेरणीचा खर्चही निघाला नाही. अनेक शेतकर्याना खरीप पीकविम्याची रक्कम देखील मिळाली नाही. या अस्मानी व सुलतानी दुहेरी संकटाचा सामना करीत शेतकरऱ्यांनी खरीप पेरणी सुरू केली आहे.