

भूम, पुढारी वृत्तसेवा : भूम शहराच्या लगत कुंथलगिरी रोडवर आज (दि. १९) दुपारी १ वाजता शुकूर बागवान यांच्या शेतातील गोडाऊनला अचानक आग लागली. या आगीत गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाले. अंदाजे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच भूम नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोहोचून वीज पुरवठा बंद करण्यात आला.
शुकूर बागवान यांचे कुंथलगिरी रोडलगत फळांसाठी वापरले जाणारे कॅरेट, ट्रॅक्टरचे टायर्स व इतर साहित्य ठेवलेले गोडाऊन होते. ही आग इतरत्र पसरू नये, म्हणून अग्निशमन दलाने आजूबाजूच्या शेताच्या बांधावर पसरलेली आगही विझवली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या अचानक लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.