

Dharashiv News : Youth dies in bike collision; Offense against the driver
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: दुचाकी निष्काळजीपणे चालवून धडक दिल्याने झालेल्या अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश दिलीप हाके (वय २५, रा. येडशी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास योगेश हाके व आकाश पोपट पवार (रा. येडशी) हे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पोलिस चौकीच्या पुढून जात होते. यावेळी दुचाकी चालकाने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवून धडक दिली. या अपघातात योगेश हाके गंभीर जखमी झाले.
त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचे वडील दिलीप दिपाजी हाके (वय ५६) यांनी दि. ७ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात आकाश पवार याच्याविरुद्ध भा. न्या.सं. कलम १०६ (१), २८१, १२५(अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव शहर वाहतूक शाखा व संबंधित पोलिस ठाण्यांच्या वतीने दि. ७ नोव्हेंबर रोजी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यानुसार एकूण २८५ कारवाया करून २ लाख ५२ हजार ५०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.