

Female doctor beaten up, case registered against Ram Sing Bawari
जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
द्वारका ते बागवानपुरा रस्त्यावर अनोळखी रुग्णास रेस्क्यूसाठी पोहोचलेल्या १०८ च्या महिला डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. महिला डॉक्टरसोबत वाद घालून कानशिलात लगावल्याप्रकरणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे संशयित रामसिंग बावरी (रा. द्वारका सर्कल) यांच्या विरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. नाहील मुस्ताक खतीब (४७, रा. अशोकामार्ग) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बुधवारी (दि. २३) सकाळी ७.४५ च्या सुमारास संशयित बावरी यांनी १०८ या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधून मदत मागितली होती. त्यानुसार रुग्णवाहिका चालक सागर कदम यांच्यासोबत डॉ. खतीब यांनी घटनास्थळ गाठले. तेथे बावरी यांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच कानशिलात मारली. 'तुला जेवढे बोललो तेवढे कर, तुला कोणाला सांगायचे ते सांग' असे बोलून धमकावलेही. ही वार्ता काही वेळातच शहरातील वैद्यकीय क्षेत्रात पसरली.
त्यानुसार, शहरातील पाचही रुग्णवाहिका चालक व डॉक्टरांनी तातडीने रुग्णवाहिकांसह भद्रकाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी १०८ हेल्पलाइनच्या व्यवस्थापकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरल्याने, अखेर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.
दरम्यान, संशयित बावरी यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात लोकसेवकाला कर्तव्यापासून रोखत प्राणघातक हल्ला करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे आदी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णवाहिका चालक व डॉक्टरांनी गुन्हा दाखल होईपर्यंत कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पोलिसांवर दबाव निर्माण झाला. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टर मागणीवर ठाम राहिले. परिणामी, दोन-तीन तास शहरातील आपत्कालीन सेवा ठप्प झाली होती. शेवटी गुन्हा दाखल होताच सेवा पूर्ववत झाली.