

Dharashiv News: Solid waste management stalled in Bhum city
भूम, पुढारी वृत्तसेवा : शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची निविदा प्रक्रिया मागील महिनाभरापासून रखडल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. कचरा संकलन ठप्प झाल्यामुळे विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्नाकडे नगरपरिषद प्रशासनासह सत्ताधारी गटांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्णयप्रक्रिया थांबल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र आचारसंहिता संपल्यानंतरही विशेष सर्वसाधारण सभा न झाल्याने निविदा प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. परिणामी अनेक मोकळ्या जागा तात्पुरत्या कचरा डेपोमध्ये रूपांतरित झाल्या असून पावसामुळे दुर्गंधी व रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. डास, माश्या यांचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्गजन्य आजारांची भीती व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून पाणीपुरवठा, पथदिवे आणि इतर मूलभूत सुविधाही विस्कळीत झाल्याचा आरोप होत आहे. नगरसेवक चंद्रमणी गायकवाड यांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर स्वखर्चातून स्वच्छता मोहीम राबवून दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
तर जनशक्ती नगर विकास आघाडीचे गटनेते रुपेश शेंडगे यांनी घनकचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचाराचे आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भूम शहरातील पार्टी रोडवरील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर टाकलेल्या कचऱ्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमोले यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन तातडीने कचरा उचलण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाकडे कारवाईची मागणी
कचरा व्यवस्थापन ठप्प झाल्याने नागरिक संतप्त झाले असून नगरपरिषदेने तातडीने विशेष सभा घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, कचरा उचलावा आणि स्वच्छता व्यवस्था सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.