

Multi-crore drain cleaning fails at the very first rain!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : करण्यात आलेल्या नालेसफाई पहिल्याच पावसात फेल ठरल्याचे मंगळवारी (दि.२३) झालेल्या पावसाने उघड केले आहे. यात दलालवाडी परिसरातील औषधी भवनसमोरील नाल्याची समस्या अद्यापही कायम असून, या भागातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. या भागातील पाणीनिचरा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेने कोटींचा निधी खर्च करून नाल्याचे बांधकाम आणि सुधारणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेले नसल्याचे दिसून येत आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती अनिल मकरिये व महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित विभागाला दिले होते. यात दलालवाडी परिसरातील नाल्याची २० टक्के सफाई झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात पावसाचे पाणी रस्त्यावर साचले. तर पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहतुकीची कोंडी झाली, यासह अनेक व्यावसायिक प्रतिष्ठानांनाही त्याचा फटका बसला.
त्यामुळे नाला सफाई आणि पाणी निचरा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
कचरा टाकल्याने नाल्यात अडथळे
महापालिकेने यंदा औषधी भवन परिसरातील नाल्याची संपूर्ण साफसफाई केल्याचा दावा केला असला, तरी काही व्यावसायिकांकडून पुन्हा नाल्यात कचरा टाकला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पुड्याची खोकी, प्लास्टिक व इतर टाकाऊ साहित्यामुळे नाल्यात अडथळे निर्माण होत असून पाण्याचा प्रवाह खोळंबत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांच्या तीन प्रमुख मागण्या
औषधी भवनसमोरील नाल्याची नियमित आणि प्रभावी स्वच्छता करावी. यासह नाल्यात कचरा व टाकाऊ साहित्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करावी. तसेच दलालवाडी परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा. कोट्यवधी रुपये खर्चुनही समस्या कायम राहिल्याने महानगरपालिकेच्या नियोजन आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.