

Dharashiv News: Shutdown in Vashi; one-hour road blockade at Saramkudi Phata
वाशी, पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला वाशी विधीज्ञ मंडळाने नैतिक, लोकशाही व घटनात्मक पद्धतीने पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, आंदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) वाशी तालुक्यातील इंदापूर, पारा, पारगाव व तेरखेडा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
तसेच सरमंकुडी फाटा येथे सोलापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीकृष्ण सांगळे यांना देण्यात आले. निवेदनावर भास्कर गायकवाड, प्रमोद पाटील, प्रमोद गायकवाड, रविकांत गायकवाड, संजय गायकवाड, आकाश पवार, बालाजी पवार, सुजित खाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, वाशी विधिज्ञ मंडळाच्या बैठकीत आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला नैतिक, लोकशाही व घटनात्मक पद्धतीने पाठिंबा देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेले आंदोलन हे लोकशाही व शांततामय मार्गाने मागण्या मांडण्याचे माध्यम असल्याचे मंडळाने म्हटले आहे.
भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या लोकशाही मूल्यांचा व घटनात्मक अधिकारांचा आदर राखून शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने व संवेदनशीलतेने विचार करावा, अशी भूमिका मंडळाने घेतली. शासनाने आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक व रचनात्मक संवाद साधून मराठा समाजाच्या मागण्यांवर कायदेशीर, घटनात्मक व न्याय्य मार्गाने निर्णय घ्यावा. या प्रश्नाची कायमस्वरूपी व सर्वमान्य सोडवणूक करण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणीही विधीज्ञ मंडळाने केली.
यावेळी 'न्याय, हक्क आणि संविधानिक मार्गाने संघर्ष यालाच आमचा पाठिंबा!' अशी भूमिका मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. ठरावाची प्रत संबंधित शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. बैठकीस वाशी विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. एन. कावळे, सचिव अॅड. महेश एम. आखाडे, उपाध्यक्ष अॅड. के. एस. लागडे, कोषाध्यक्ष अॅड. एस. के. कुरुंद यांच्यासह मंडळाचे सदस्य व विधीज्ञ उपस्थित होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाशी पोलीस ठाण्याचे पो. नि. शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.