

Samruddhi Expressway Robbery Gang Arrested
वाशी : समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहने पंक्चर करून प्रवाशांना अडवून मारहाण करत लूटमार करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबवले. धाराशिव पोलिसांच्या मदतीने वाशी तालुक्यातील खामकरवाडी, तेरखेडा, उमरा आणि परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी एका कारला लक्ष्य केले होते. रात्रीच्या वेळी वाहन अडवून प्रवाशांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून आरोपी पसार झाले होते. याच पद्धतीने आणखी काही वाहनांना लक्ष्य करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
वाहन पंक्चर करून प्रवाशांना अडवणे, त्यांच्यावर हल्ला करणे आणि त्यानंतर दागिने व रोकड लुटणे, या घटनांमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनांची गंभीर दखल घेत पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी तपासाला वेग दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय झाली. नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक तपासासाठी धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले. धाराशिव पोलिसांच्या सहकार्याने संशयितांच्या हालचालींबाबत माहिती संकलित करण्यात आली.
त्यानंतर वाशी तालुक्यातील विविध गावांत कोंबिंग ऑपरेशन राबवून संशयितांची चौकशी करण्यात आली. या कारवाईत सात जण पोलिसांच्या ताब्यात आले. त्यांचा समृद्धी महामार्गावरील लुटीच्या घटनांशी थेट संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.
ताब्यातील संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीतून टोळीतील अन्य साथीदार, लुटीची पद्धत तसेच महामार्गावरील इतर गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण आणि धाराशिव पोलिसांच्या संयुक्त तपासामुळे या लुटीच्या घटनांमागील टोळीपर्यंत पोहोचण्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.