Dharashiv Politics : शिंदे सेना, भाजपच्या लढाईत ठाकरेंच्या शिवसेनेची वाताहत

पक्षाचे जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांनी बंडखोर नगरसेवकांवर अपात्रतेसाठी कायदेशीर लढाईचा इशारा दिला असल्याने राजकीय नाट्याचा नवीन अंक सुरू होणार
Shivsena UBT
Shivsena UBTPudhari
Published on
Updated on

धाराशिव : भीमाशंकर वाघमारे

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून राजकीय बॉम्ब फुटत आहेत. सत्ताधारी पक्ष असलेले भाजप तसेच शिंदेंची शिवसेना यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. यात सर्वाधिक फटका मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला बसला आहे. अर्थात, या पक्षाचे जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांनी बंडखोर नगरसेवकांवर अपात्रतेसाठी कायदेशीर लढाईचा इशारा दिला असल्याने राजकीय नाट्याचा नवीन अंक सुरू होणार आहे.

पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कळंब पालिकेत पक्षांतराचा पहिला प्रयोग झाला. या पालिकेत भाजप व शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आहे. इथे ठाकरेंची शिवसेना ९ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होती. निम्मे बळ विरोधी पक्षाकडे असल्याने आगामी निवडणुका लक्षात घेता त्यांना फोडण्याकडे भाजप, शिंदे शिवसेनेचा प्रयत्न होता. इथे नगराध्यक्षपदी शिंदे शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.

Shivsena UBT
Rambai Ranveer inspirational story : लेकीच्या शिक्षणासाठी आईची मॅरेथॉन दौड!

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कळंबचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याने तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी सेफ झोन तयार करण्याची खेळी सत्ताधारी पक्षांनी आखली आहे. त्यात कळंबमध्ये बाजी मारली ती भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी. त्यांनी ठाकरे शिवसेनेचे सर्व ९ आणि काँग्रेसचा एक असे दहा नगरसेवक पक्षात घेतले. परिणामी भाजपचे बळ निर्विवाद वाढले. आता आगामी काळात भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सत्ताधाऱ्यांतच शीतयुद्धाचा प्रकार पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

कळंबचा डाव यशस्वी झाल्यानंतर भाजपने मोर्चा वळवला तो धाराशिव पालिकेकडे. या पालिकेत ठाकरेंचे सात नगरसेवक आहेत. यातील पाच जणांना गळाला लावल्याची चर्चा समाजमाध्यमांवर रंगली. हे नगरसेवक प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने निघालेही. मात्र, रस्त्यातच या नगरसेवकांत वाद सुरू झाले. सोबतच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही तगडी फिल्डिंग लावली. त्यानंतरचे नाट्य घडले आणि मोठ्या अर्थपूर्ण घडामोडींनंतर चार नगरसेवक ठाण्यात पोहोचले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतले. तर केवळ एकमेव नगरसेवक भाजपच्या गोटात पोहोचला. या खेळीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ दोन नगरसेवक उरले आहेत.

Shivsena UBT
Samruddhi Expressway accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एक ठार, १० प्रवासी जखमी

प्रत्यक्षात धाराशिव पालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही त्यांनी विरोधी नगरसेवकांना फोडण्याचे तंत्र वापरले आहे. तर पालिकेत अस्तित्वहीन असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला चार नगरसेवकांची लॉटरी लागली आहे. एकूणच हे राजकीय नाट्य पाहता आता यापुढील काळात खरी रंगत येणार आहे. शिवसेनेच्या सर्व फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा आ. कैलास पाटील यांनी दिला आहे.

या पक्षाचे जे प्रतोद आहेत, ते भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. तर चार नगरसेवकांनी धोका दिल्याने भाजपही संतप्त आहे. त्यामुळे या चार नगरसेवकांना धडा शिकविण्यासाठी ठाकरेंची शिवसेना व भाजपची पडद्यामागे हातमिळवणी होऊ शकेल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. आता हे अंदाज खरे ठरतात की हे नाट्य पुढे वेगळे वळण घेते, याचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे. तोपर्यंत मात्र जिल्ह्यातील अन्य पालिकांतील नगरसेवक सांभाळून ठेवण्याची कसरत महाविकास आघाडीला करावी लागणार आहे.

मतदारांच्या भावना पायदळी

वास्तविक, नगरपालिका निवडणुकांत नागरिकांनी स्पष्ट कौल दिलेला होता. अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना काठावरचे बहुमत देऊन मतदारांनी वेसण घातली होती. प्रत्यक्षात मतदारांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवून विरोधी पक्षाची जबाबदारी दिली, त्यांनीच मतदारांच्या भावना पायदळी तुडवत सत्तेच्या वर्तुळात प्रवेश केला आहे. या प्रवेशनाट्यात घडलेल्या आर्थिक घडामोडी शहरात पसरल्या आहेत. त्यामुळे मतदारांतही अशा पक्षबदलू नगरसेवकांची मोठ्या चवीने चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news