Sugarcane Loss : पाच एकर ऊस वादळी वाऱ्याने केला भुईसपाट

नऊ महिन्यांची मेहनत, तीन लाख कर्ज, अखेर शेतकऱ्याच्या पदरात काय ?
Sugarcane Loss
पाच एकर ऊस वादळी वाऱ्याने केला भुईसपाटfile photo
Published on
Updated on

Five acres of sugarcane flattened by stormy winds

भूम, पुढारी वृत्तसेवा नऊ महिने ऊन-पावसाशी झुंज देत ऊस जगविला... दुष्काळाच्या छायेत थेंब थेंब पाणी देत पीक वाढविले... खते, औषधे, मजुरी आणि पाण्यासाठी जवळपास तीन लाख रुपये खर्च केले. ऊस आता हातात येईल, घरची आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा बाळगली. मात्र, अवघ्या काही मिनिटांच्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्याच्या नऊ महिन्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फेरले.

भूम तालुक्यातील पाठसांगवी येथील शेतकरी शशीराज माने यांचा पाच एकर ऊस वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाला असून, 'एवढा खर्च करून आता शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार?' असा काळजाला चटका लावणारा सवाल उभा राहिला आहे. भूम तालुक्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. खरीप पिके वाचविण्यासाठी धडपड सुरू असतानाच उपलब्ध पाण्यावर ऊस जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. अशा परिस्थितीत शशीराज माने यांनी पाच एकर ऊस पीक जगविण्यासाठी मोठी आर्थिक आणि शारीरिक मेहनत घेतली.

Sugarcane Loss
Dharashiv News : पिके करपली; आता सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार !

ऊस लागवडीपासून ते वाढीपर्यंत पाणी, खते, औषधांची फवारणी, मशागत आणि मजुरी यासाठी माने यांनी मोठा खर्च केला. दुष्काळी परिस्थितीत पाण्याची उपलब्धता कमी असल्याने प्रत्येक थेंबाचे नियोजन करत त्यांनी पीक जगविले.

तब्बल नऊ महिने काळजी घेतल्यानंतर ऊस चांगला उभा राहिला होता. त्यामुळे आता कष्टाचे चीज होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास पाठसांगवी परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही वेळातच शेतातील उभा असलेला पाच एकर ऊस जमीनदोस्त झाला. डोळ्यादेखत उभे पीक आडवे होताना पाहण्याची वेळ माने यांच्यावर आली.

एकीकडे पावसाने पाठ फिरवल्याने पिकाला पाणी देण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. दुसरीकडे निसर्गाने वादळाच्या रूपाने तडाखा दिला. त्यामुळे पाण्यासाठी केलेला खर्च, नऊ महिन्यांची मेहनत आणि पीक हातात येण्याची आशा- सगळेच एका क्षणात संकटात सापडले आहे. ऊस जमीनदोस्त झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यापुढे आता कर्ज, उत्पादन खर्च आणि पुढील हंगामाची चिंता उभी राहिली आहे.

Sugarcane Loss
Ghatasthapana 2026 : तुळजाभवानी मंदिरात यंदा ११ ऑक्टोबरला होणार घटस्थापना

मेहनत गेली वाया

नऊ महिने राबलो... जवळपास तीन लाख रुपये खर्च केले... ऊस हातात येण्याची वेळ आली आणि वादळाने सगळे जमीनदोस्त केले. आता एवढा खर्च आणि एवढी मेहनत करून शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार? हा शशीराज माने यांचा सवाल केवळ त्यांचा नसून, निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या व्यथेला शब्द देणारा आहे.

पंचनामा तरी करा; नुकसान शासनाच्या निदर्शनास आणा'

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दुष्काळात पिके जगविण्यासाठी शेतकऱ्याने केलेला अतिरिक्त खर्च आणि आता वादळामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news