

धाराशिव : जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश प्रक्रियेत यंदा जिल्हा परिषद शाळांनी उल्लेखनीय यश संपादन करत ग्रामीण शिक्षणाचा झेंडा उंचावला आहे. एकूण 80 जागांपैकी तब्बल 66 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधून निवड झाले असून ग्रामीण भागातील 77 विद्यार्थ्यांची निवड झाल्याने या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तालुकानिहाय निकालात धाराशिव (20), तुळजापूर (18), कळंब (13), उमरगा (07), भूम (07), लोहारा (07), वाशी (04) आणि परंडा (04) असे एकूण 80 विद्यार्थी निवड झाले. यामध्ये जिल्हा परिषद शाळांचा वाटा लक्षणीय आहे. धाराशिव तालुक्यात 20 पैकी 18, तुळजापूर 18 पैकी 16, कळंब 13 पैकी 12, उमरगा 7 पैकी 4, भूम 7 पैकी 4, लोहारा 7 पैकी 5, वाशी 4 पैकी 2 आणि परंडा 4 पैकी सर्व 4 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधून निवड झाले आहेत.
मागील वर्षी 63 विद्यार्थी निवड झाले होते, तर यंदा हा आकडा 66 वर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या कामगिरीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये स्वनियोजित निधीतून जचठ पद्धतीवर आधारित दोन सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम यंदाच्या निकालात दिसून आला आहे.
या यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्ष उषाताई गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे तसेच उपशिक्षणाधिकारी कैलास पिकवणे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे. सर्वांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रयत्नांतून विद्यार्थ्यांनी ही कामगिरी साध्य केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक क्षमता व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाणीव अधोरेखित झाली आहे. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांनी असेच यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.