

Dharashiv Husband ends life after killing wife and child
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा :
आर्थिक अडचणीत आल्याने तालुक्यातील बावी येथे एका व्यक्तीने पत्नी, मुलाला संपवून स्वतः गळफास घेत जीवन संपवले. सोमवारी (दि. १६) सकाळी हा प्रकार उजेडात आला.
बावी येथील लक्ष्मण मारुती जाधव (३०) हा तरुण आर्थिक अडचणीत होता. ऑनलाईन जुगार व रम्मीच्या माध्यमातून अधिक पैसे मिळविण्याच्या हव्यासाने त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता, अशी माहिती आहे. या नादातच त्याने त्याची काही जमीनही विकल्याचे सांगितले जात आहे. हे कर्ज डोईजड झाल्याने लक्ष्मणने हे कृत्य केल्याचा अंदाज आहे.
सोमवारी सकाळी अकरा वाजून गेले तरी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्याने अधिक चौकशी केली असता घरात लक्ष्मण, त्याची पत्नी तेजस्विनी व दोन वर्षांचा मुलगा शिवांश हे तिघेही मृतावस्थेत आढळले. लक्ष्मणने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी, मुलाला ठार मारले.
त्यांनी त्यास विष दिले की गळा दाबला हे कळू शकले नाही. घटना समजल्यानंतर पोलिस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्यासह ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांनी भेट दिली. याबाबत पोलिस अधीक्षक खोकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, आर्थिक अडचणीत सापडल्याने या कुटुंबाने हे कृत्य केले असावे, असा अंदाज आहे.