

भूम : भूम तालुक्यातील देवळाली गावात काळजाला चटका लावणारी घटना घडली आहे. गावातील युवक गणेश दगडू तांबे (वय ३८) हा २३ सप्टेंबर रोजी पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. सलग चार दिवस चाललेल्या प्रतीक्षेनंतर आज अखेर त्याचा मृतदेह परांडा तालुक्यातील सरणवाडी स्मशानभूमीजवळ नदीकाठी सापडला. देवळालीपासून तब्बल ३० ते ३२ किलोमीटर अंतरावर पार्थिव मिळाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
२२ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे देवळाली परिसराला पूर आला होता. २३ सप्टेंबरच्या संध्याकाळी गणेश तांबे घराकडे जात असताना जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेनंतर एनडीआरएफ व स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली होती. मात्र चार दिवस कोणताही थांगपत्ता न लागल्याने ग्रामस्थ व नातेवाईक हतबल झाले होते.
आज सकाळी असू गावातील शेतकरी समाधान मासाळ शेत पाहणी करताना नदीकाठी गेले असता त्यांना एक मृतदेह दिसला. तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली असता देवळाली येथील महिलांमार्फत मृतकाची ओळख नातेवाईकांना कळली. सरपंच विशाल ढगे व फिरोज खान घटनास्थळी धावले. युवकाच्या हातातील दोरा, राखी, चेहऱ्याची वैशिष्ट्ये व उंचीच्या आधारे मृतदेह हा गणेश तांबे यांचाच असल्याची खात्री झाली.
गणेश तांबे यांचे पार्थिव देवळाली येथे आणताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून तांबे कुटुंबीयांना शासकीय मदत जाहीर करावी, अशी ग्रामस्थांची मागणी करण्यात आली आहे.