

Heavy rains, flood crisis in Dharashiv district
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात रविवारपासून पावसाने पुन्हा धुवाधार हजेरी लावल्याने बहुतांश तालुक्यांत पुराचे संकट निर्माण झाले आहे. सोमवारी सकाळी नोंदल्या गेलेल्या पावसानुसार जिल्ह्यात ६५ मिमी अर्थात अतिवृष्टीचे नोंद झाली आहे. तर भूम आणि परंडा तालुक्यांत अनुक्रमे १०६ आणि १०८ मिमी पावसाची नोंद २४ तासांत झाली आहे.
धाराशिव शहरासह तालुक्यात सोमवारी दुपारपासून जोरदार पावसाळा सुरुवात झाली. कळंब तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. येरमाळा, तेरखेडा परिसरात पाऊस होत असल्याने तेरणा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे गोवर्धनवाडी ते तेर रस्ता सोमवारी दुपारी बंद झाला.
तेरणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने हा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. धाराशिव शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेला आहेत. उमरगा तालुक्यात ७१.४, लोहारा तालुक्यात ६५.१ अशी चार तालुक्यांत २४ तासांत अतिवृष्टी झाली आहे. तर वाशी ६१.९, धाराशिव ४३.७, तुळजापूर ३६.२ आणि कळंब ४५.२ मिमी असा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात २४ तासांत ६५ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. आजपर्यंत ७७१.४ मिमी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या १३९. टक्के आहे.