

भूम/परांडा: तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (NDRF) दोन तुकड्यांना (५ बटालियन) पाचारण केले होते. या जवानांनी भूम आणि परांडा तालुक्यात मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवून २३९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश मिळवले.
भूम तालुक्यातील जयवंतनगर वस्तीला पुराचे पाण्याने वेढा दिला होता. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात सुटकेची गरज भासली नाही. मात्र, देवळाली येथील गणेश तांबे (वय ३८) हा युवक २३ सप्टेंबर रोजी पुराच्या पाण्यात वाहून गेला. या घटनेनंतर एनडीआरएफच्या जवानांनी दोन किलोमीटरपर्यंत सलग सर्च ऑपरेशन राबवले. उसाच्या मोठ्या फडांमुळे बोटींना अडथळे आल्याने शोधमोहीमेत अडचणी आल्या. तरीसुद्धा जवानांचा प्रयत्न सुरू असून युवकाचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही.
याउलट, परांडा तालुक्यात परिस्थिती गंभीर स्वरूपाची होती. नदीचे पाणी गावांमध्ये घुसल्याने वस्तीवरील नागरिक अडकून पडले होते. एनडीआरएफच्या जवानांनी वागे गव्हाण (१८०), कपिलापुरी (१२), जगताप वस्ती (२७) आणि ठोंगे वस्ती (२०) येथील एकूण 239 नागरिकांची सुटका केली.
ठोंगे वस्ती परिसरात उसाचे व मकाचे फड असल्याने बोट पोहोचवणे अवघड झाले. अशा वेळी जवानांनी बोट बाजूला लावून पाण्यातूनच मार्ग काढला व मुलांना तसेच ज्येष्ठांना पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी आणले. एनडीआरएफचे धाडस व तळमळीचे कार्य पाहून स्थानिक नागरिकांनी दिलासा मानला व जवानांचे आभार मानले.
एनडीआरएफ पथकाचे प्रमुख इन्स्पेक्टर महेंद्रसिंग पुनिया यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हे बचावकार्य शक्य झाले. दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत जवानांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले.