

उमरगा : शहराच्या बायपास मार्गालगत कोरेगाववाडी रस्त्यानजीक एका तरुणाचा धारदार हत्यार व दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली. सकाळी नागरिकांना रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या खुनामागचे नेमके कारण काय आणि मारेकरी कोण, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील कोरेगाववाडी रस्त्यावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर नागरिकांनी तातडीने उमरगा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत भराटे, पांडुरंग कन्हेरे, पोलिस उपनिरीक्षक गजानन पुजारवाड यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेहाची पाहणी केली असता दगडाने ठेचल्याचे स्पष्ट झाले. मयताच्या अंगातील शर्टावर असलेल्या टेलरच्या नावावरून व स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृताची ओळख पटवली. शाहुराज महादु सूर्यवंशी (वय 38, रा औटी गल्ली, दक्षिणमुखी हनुमान मंदिराशेजारी, उमरगा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, तपासासाठी धाराशिव येथून फॉरेन्सिक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलिस अधिकारी मेघना नागराज यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाची माहिती घेतली. श्वान पथकाचा माग थेट औटी गल्लीतील मयताच्या घरापर्यंत गेल्याने हा खून कौटुंबिक वादातून झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अन्य कारणांचा देखील पोलिसांकडून तपास सुरू असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.