

धाराशिव : मूळ भाजपचे लोक चांगले आहेत, पण त्या पक्षात शिरलेला हा उंट सत्तांतर होताच दुसऱ्या मंडपात सर्वात अगोदर निघून जाईल, हे भाजपने लक्षात ठेवावे,“ अशा शब्दांत आमदार तानाजी सावंत यांनी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. तसेच, “पहाटेपर्यंत झुलवत ठेवून त्यांनी शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांपासून ते गल्लीतल्या शाखाप्रमुखापर्यंत सर्वांना मूर्खात काढले, असा आरोपही त्यांनी केला.
ढोकी (ता. धाराशिव) येथील तेरणा सहकारी साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यात सोमवारी (दि. 5) ते बोलत होते. धाराशिव नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर आ. सावंत यांनी मौन सोडले. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, संपर्कप्रमुख आणि मित्रपक्ष भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
निवडणुकीत आपल्याला बाजूला ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना सावंत म्हणाले, पक्ष नेतृत्वाने जर धाराशिव पालिका निवडणुकीत मला लक्ष घालायला सांगितले असते, तर ही पालिका मी जिंकून दाखवली असती. 2017 मध्ये पालिकेतील सत्ता उलथवणारा हाच तानाजी सावंत आहे. त्यावेळी सुरज साळुंकेंना उपनगराध्यक्ष केले, तर भाजपचा उमेदवार विरोधात असतानाही 1100 मतांनी मकरंद राजेनिंबाळकरांना विजयी केले. आता जर मी प्रक्रियेत असतो, तर 41 जागांवर शिवसैनिकांच्या ताकदीवर विजय मिळवला असता.
औकात नसताना पंगा घेतला
स्वपक्षाच्या नेत्यांवर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधताना आ. सावंत म्हणाले, औकात नसताना काही नेत्यांनी पंगा घेण्याचा आणि मला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. पण याची खरी झळ नेत्यांना नाही, तर सामान्य शिवसैनिकांना बसली. पहिल्यांदाच धाराशिव पालिकेत पाय टाकायला जागा राहिली नाही, याची खंत वाटते.