

Dharashiv Crime Murder News
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. भावजयीसोबतचे अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीपोटी चुलत्याने आपल्या अवघ्या १३ वर्षीय पुतण्याची कुऱ्हाडीने निघृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ओमकार देवीदास कांबळे (रा. कोळसुर, ता. उमरगा) असे आरोपीचे नाव असून, त्याने कृष्णा सदानंद कांबळे (वय १३) या पुतण्याचा खून केला. कृष्णाला आपल्या आई ज्योती कांबळे व चुलते ओमकार कांबळे यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती होती.
ही बाब तो वारंवार आपल्या वडिलांना सांगत असल्याने आरोपीच्या मनात राग व भीती निर्माण झाली होती. ही घटना सोलापूरधुळे राष्ट्रीय महामार्गालगत तामलवाडी शिवारातील एका शेतात घडली. १ जानेवारी रोजी दुपारी ओमकारने विद्युत पंपाचा पाईप बसवायचा आहे, असा बहाणा करून कृष्णाला साठवण तलावाजवळ नेले.
परिसरात कोणी नसल्याची खात्री करून त्याने कुऱ्हाडीने वार करत कृष्णाची जागीच हत्या केली. त्यानंतर मृतदेह गवतात लपवून आरोपी फरार झाला.५ जा-नेवारी रोजी तलावाजवळील गवतात बालकाचा मृतदेह आढळल्यानंतर तामलवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तपासात मयताची ओळख पटली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी कोळसुर येथून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करण्यात आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.