

Devotees' enthusiasm for the Sharadiya Navratri festival of Yedeshwari Devi
येरमाळा, पुढारी वृत्तसेवा : येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला भक्तीचा उत्साह लाभला असून, पंचरात्रीनिमित्त शुक्रवारी (दि. २६) देवीच्या तांदळ्ळ्यावर मोराची महापूजा मोठ्या श्रद्धा-भावनेने पार पडली. देवीचे मनमोहक रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी होत आहे.
सभामंडप आणि दादऱ्यावरून दर्शन घेण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागत होता. विशेष म्हणजे, या दिवशी महिला भाविकांची विशेष गर्दी दिसून आली. देवीचा नवरात्र महोत्सव हा महिला शक्तीचा जागर मानला जात असल्याने पंचरात्रीनिमित्त महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. दि.२२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाची सुरुवात झाली. नवरात्र काळात देवीच्या डोंगरावर खेटे घालण्याची प्रथा आहे.
स्थानिक भाविक रोज एक खेटा घालतात, तर बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना एकाच दिवशी पाच खेटे घालण्याची परवानगी असते. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, वैराग, माढा, कुर्दुवाडी, तसेच लातूर, मुरुड, धाराशिव, बीड, चौसाळा, पाटोदा, केज, धारूर, भूम, वाशी, कळंब, परंडा यांसह मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना येथून भाविक दर्शनासाठी आले होते. तुळजापूरला पायी जाणारे अनेक भाविक येडेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी देखील पायी पोहोचले.
पंचरात्री निमित्त खेटा मार्ग भाविकांनी फुलून गेला होता. मंदिर परिसरात भक्तिरसाचा प्रत्यय दिसून येत होता. मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांमुळे परिसरातील कपड्याची दुकाने, प्रसादभांडार, खाद्यपदार्थ व लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकाने फुलून गेली.