

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज पाचव्या माळेच्या दिवशी ललिता पंचमी निमित्त रथ अलंकार महापूजा झाली. मागील आठवड्यापासून तुळजापूर परिसरामध्ये दररोज मुसळधार पाऊस होत असल्याने भाविक भक्तांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
धार्मिक आख्यायिकेनुसार भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिला होता. त्या परंपरेतून आजही रथ अलंकार अवतार पूजेला विशेष महत्व आहे. दरम्यान, काल गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी चौथ्या माळेच्या दिवशी मोर वाहनावरून श्री तुळजाभवानी देवींची पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शारदीय नवरात्र उत्सवाच्या दरम्यानच्या काळात दररोज मुसळधार पाऊस होत असल्यामुळे भावी भक्तांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या सर्व बाजूंनी उभारण्यात आलेले वाहन तळ चिखलाने माखले असल्याने भाविकांना या चिखलामधून वाट काढत मंदिराकडे जावे लागले. या दरम्यान थंडी देखील असल्यामुळे वयोवृद्ध लोकांना या थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे. शासकीय यंत्रणेकडून करण्यात आलेल्या उपाययोजना देखील अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे.