

Cycle rally in Dharashiv giving the message of drug-free India-developed India
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : "नशामुक्त भारत-विकसित भारत, नशामुक्त भारत-सशक्त भारत" चा संदेश देत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत धाराशिव येथे गुरुवारी (दि. १३) सकाळी ८ वाजता नशामुक्ती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून नशामुक्त, सशक्त व विकसित समाज निर्माण करण्याचा संकल्प करावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भंडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सचिन कवले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, विविध शाळांमधील विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे संदेश असलेले फलक व पोस्टर्स हातात घेऊन जनजागृती केली. "नशामुक्त भारत-विकसित भारत", "नशामुक्त भारत-सशक्त भारत" आणि "नशामुक्त धाराशिव-विकसित धाराशिव" अशा घोषणांनी रॅलीचा परिसर दुमदुमून गेला. व्यसनमुक्त समाजाची निर्मिती ही केवळ शासनाची जबाबदारी नसून त्यासाठी युवक, पालक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
व्यसनांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक स्थितीवर तसेच समाजाच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून स्वतः दूर राहण्याबरोबरच आपल्या मित्र-परिवारालाही व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश द्यावा, हा व्यापक उद्देश या जनजागृती उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद धाराशिवच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले. रॅलीच्या यशस्वितेसाठी क्रीडा कार्यालय, समाजकल्याण विभाग, सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग तसेच विविध प्रशासकीय विभागांनी सहकार्य केले. यश मेडिकल फाउंडेशन संचलित येळाई व्यसनमुक्त्ती केंद्र, येरमाळा यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. व्यसनमुक्त युवक हीच सशक्त राष्ट्राची ताकद असून, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि विधायक उपक्रमांकडे वळावे, असा संदेश देत रॅलीतून नशामुक्त धाराशिव-विकसित धाराशिव' चा संकल्प करण्यात आला.