

Narayan Rane on Nitesh Rane
धाराशिव : "मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा 'बाप', म्हणणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री हे जनतेचे सेवक असतात. याबाबत मंत्री नितेश यांना समज दिली आहे, असे स्पष्टीकरण माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी दिले. तुळजापूर येथे श्रीतुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
खासदार राणे म्हणाले, मी स्वतः मुख्यमंत्री होतो. त्यावेळी जर कोणी मला 'साहेब' म्हटले, तर मी त्यांना सांगायचो की मला साहेब म्हणू नका, मी जनतेचा सेवक आहे. काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे झालेल्या एका कार्यक्रमात मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विधान करताना, "ते सर्वांचे बाप म्हणून मुख्यमंत्री पदावर आहेत, असे वक्तव्य केले होते.
या विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत नाराजीचा सूर उमटला होता. यावरून राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा आणि टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर खा. राणे यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.
ते म्हणाले की, नितेश राणे यांना या संदर्भात समज दिली आहे. या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाले होते. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर बुधवारी मुंबई, ठाणे परिसरात ठाकरे शिवसेनेने प्रमुख चौकांमध्ये 'देवेंद्र गंगाधर फडणवीस' माझे बाप नाहीत', अशी फलकबाजी करीत शिंदे सेनेवर प्रहार केला आहे.