

Businessman absconds with soybeans
रत्नापूर, पुढारी वृत्तसेवा: शेतकऱ्यांच्या घामाचे सोने असलेले सोयाबीन विक्रीसाठी दिल्यानंतर तब्बल १३ लाख २७ हजार ८६३ रुपयांची फसवणूक झाल्याची प्रकार वाशी तालुक्यात सोनारवाडी येथे उघडकीस आला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल घेतला आणि पैसे न देता फरार झाले. चार महिने उलटले तरी पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याने शेतकरी संतापले असून आंदोलनाची हाक देण्याच्या तयारीत आहेत. यंदाच्या २६ जानेवारी रोजी सोनारवाडी गावातील नारायण घोळवे व नातेवाईकांनी सोयाबीनचा मोठा साठा बार्शी येथील मोरे नावाच्या एका व्यापाऱ्याला विकला. पैसे खात्यावर जमा करतो, असा विश्वास देऊन मोरेने माल घेतला.
आयशर टेम्पो ५५२ कट्टे सोयाबीन बार्शी येथे पोचवण्यात आले. मात्र, पैसे देण्याऐवजी व्यापारी बेपत्ता झाला. मोबाईल बंद व्यापारी गायब यातील सर्व व्यापाऱ्यांशी सुरुवातीला संपर्क होता. पण २० जानेवारीनंतर त्यांचे मोबाईल क्रमांक बंद झाले. गावोगाव शोध घेतल्यानंतरही ते हाती लागले नाहीत, अशा तक्रारी शेतकरी करू लागले आहेत. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, पोलिसांच्या मर्जीमुळेच व्यापारी अजूनही मोकाट फिरत आहेत. तक्रार झाली, पुरावे दिले, तरीही कारवाई झाली नाही. पोलिस आरोपींना पाठीशी घालत आहेत का? असा सरळ सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की शेतकऱ्यांकडे कुठलाही पुरावा नसताना आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आहे. तपास चालू आहे. एक आरोपी निष्पन्न झाला आहे. तो दवाखान्यात दाखल आहे. लवकरच पुढील कार्यवाही होईल.
शेतकरी संघटनेचे नेते रामजीवन बोंदर दै. पुढारीशी बोलताना म्हणाले, की पोलिसांनी जर लवकरात लवकर तपास नाही केला तर आम्ही येरमाळा स्टेशन समोर सदरील शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करू.
आमच्या कष्टाचा माल व्यापाऱ्यांनी गिळंकृत केला. पोलिसांनी तक्रार नोंद घेतली तरी आज चार महिने आरोपी मोकाट फिरत आहेत. जर न्याय न मिळाला, तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे फिर्यादी शेतकरी नारायण घोळवे यांनी सांगितले.
नारायण घोळवे कट्टे ३३०, रकम ८,३०,३४०, सतीश नारायण घोळवे कट्टे ११, रक्कम ३५,२००, गणेश रामराव घोळवे कट्टे, ७५, रक्कम २,१५,५१२, अविनाश दत्तू मोराळे कट्टे ६४, रकम १,३५,२३५, संजय दत्तू मोराळे कट्टे ८, रकम १६,७६१, वालाजी रावसाहेब घोळवे कट्टे ३७, रक्कम९४,८१५, एकूण कट्टे ५५२ १३,२७,८६३