Dharashiv News : सालगड्याचा मुलगा राज्य राखीव पोलिस दलात
सतीश बिरादार
देवणी घरचे अठरा विश्व दारिद्र्य अन् स्पर्धेच्या युगात वाढलेली बेरोजगारी या दुहेरी संकटाचा आपल्या जिद्द व मेहनतीने यशाला गवसणी घालत एका सालगड्याच्या मुलाने राज्य राखीव पोलीस दलात (एस.आर. पी.एफ) पुणे येथे यश संपादन केले आहे. यांचे कौतुक गावच्या प्रत्येक उंबरठ्यावर झाले ही बाब अभिमानास्पद आहे. धनेगावच्या शिरपेचात सेवेचा तुरा रोवण्याची अखंडित परंपरा आजमितीलाही सुरू आहे.
मांजरा काठावर असलेल्या धनेगाव येथील तरुणांच्या नेत्रदीपक यशावर प्रकाश टाकणारी ही यशस्वी कहाणी परमेश्वर अनिल बिरादार यांची आहे. शनिवारी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा केलेला सन्मान पाहताना कुटुंबियाबरोबरच उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.
गेल्या तीन दशकांपासून अनिल बिरादार हे दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून राब राब राबत तर आई रोजंदारीवर जायची आपली दोन्ही मुले शिकावीत म्हणून दोघांनी अफाट काबाडकष्ट केले. परमेश्वर यांनी घरची परिस्थिती पहाता कुठलेही अॅकाडमीला व शिकवणी क्लास न करता केवळ ऑनलाईन ज्ञान संपादीत करत अथक परिश्रमाने परमेश्वर हे यश संपादन केले आहे.
परमेश्वर आपला आत्मविश्वास व मनोबल न खचु देता संघर्ष मय प्रवासाने मनाला गवसणी घातली ही इतरांसाठी प्रेरणा देणारी कहाणी ठरली आहे.

