

Contract workers on strike; Health services disrupted in Paranda
परंडा, पुढारी वृत्तसेवा येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी दवाखाने, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे पूर्णपणे कोलमडली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीने पुकारलेला हा संप १९ ऑगस्टपासून सुरू आहे.
या संपामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. तालुक्यातील एकूण ३५ कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, ज्यात तालुकाप्रमुख सागर वाघचौरे, लेखापाल, कार्यक्रम व्यवस्थापक, सांख्यिकी अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायिका, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन, टीबी कर्मचारी, कुष्ठरोग कर्मचारी आणि आरोग्य सेवक यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, उपजिल्हा रुग्णालयातील ५१ अधिकारी आणि कर्मचारी, ज्यात डॉ. आनंद मोरे, डॉ. हस्मी, डॉ. स्मिता पाटील, तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम डी, अधिपरिचारिका, औषधनिर्माण अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक आणि समुपदेशक यांचा समावेश आहे, तेही संपात सहभागी आहेत.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून हे कर्मचारी कमी मानधनावर प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देत आहेत. त्यांच्या मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी १४ मार्च २०२४ रोजी राज्य शासनाने एक निर्णय घेतला होता, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी संप अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या संपाचा आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असून, शासनाने तातडीने शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि संघटनेच्या इतर १७ मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा संप कायम सुरू राहील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे, याबाबतचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक निंभोरकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अबरार पठाण यांना देण्यात आले आहे.