

Bribed with 30,000 rupees for a transfer; three Mahavitaran employees arrested.
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा :
मनासारख्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेणे आणि वरून पुन्हा २० हजार रुपयांची मागणी करणे महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.१०) सापळा रचून मानवी संसाधन (एचआर) अधिकाऱ्यासह दोन वरिष्ठ लिपिकांना अटक केली. या कारवाईमुळे महावितरणच्या लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
भारत मेथेवाड (५०, मानवी संसाधन अधिकारी, रा. लातूर), उदय दत्तात्रय बारकुल (लिपिक) आणि शिवाजी सिद्राम दूधभाते (लिपिक, दोघे रा. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
तक्रारदार हे महावितरणमध्ये कर्मचारी आहेत. त्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली हवी होती. यासाठी त्यांनी कार्यालयातील अधिकारी व लिपिकांशी संपर्क साधला. यावेळी आरोपींनी बदलीचे काम करण्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार आणि त्यांच्या मित्राच्या बदलीसाठी १० हजार रुपये, अशी एकूण ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. यातील १० हजार रुपये त्यांनी स्वीकारले. मात्र त्यानंतरही अधिकारी मेथेवाड याने पुन्हा २० हजार रुपयांची मागणी लावून धरली.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बुधवारी (दि.१०) तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.