

Thackeray Shiv Sena MLA Praveen Swami protest
उमरगा : शहरालगत बाह्यवळण रस्त्यावरील कोरेगावकडे जाणाऱ्या पुल दुरुस्तीच्या मागणीसाठी शनिवारी (दि ६) ठाकरे शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी पुलात साचलेल्या गाळमिश्रत पाण्यात तब्बल तीन तास ठिय्या मांडला. अखेर महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.
शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर बाह्यवळण मार्गावर कोरेगाव कडे जाणाऱ्या पुलाखाली गेल्या आठ महिन्यांपासून पाणी साचले आहे. यामुळे दररोज शहरात येणारे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी तसेच विविध कामांसाठी येणारे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. वाहन चालवताना वाहन चालकाना कसरत करावी लागत आहे. साचलेल्या गाळमिश्रीत पाण्यातून मार्ग काढताना वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.
याबाबतीत संबंधित विभागाला अनेक वेळा निवेदने देण्यात आली. मात्र यावर संबंधित विभागाने कसलीही कारवाई केली. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. याबाबत उबाठाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी दोन दिवसांपूर्वी पत्राद्वारे संबंधित विभागाकडे यावर उपाययोजना केल्या नाही तर पुलाखाली साचलेल्या पाण्यात बसून आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानुसार आमदार प्रवीण स्वामी यांनी शनिवारी सकाळी अकरा वाजता कोरेगाव कडे जाणाऱ्या पुलाखाली साचलेल्या गाळमिश्रत पाण्यात ठिय्या मांडला. अखेर तीन तासांनंतर संबंधित विभागाने तत्काळ सदरच्या पुलाचे काँक्रीट काम सुरु करून येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आमदार स्वामी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रतिनीधी व कंत्राटदाराला खडे बोल सुनावले. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील इतर ठिकाणचे काम तसेच पथदिवे येत्या आठ दिवसांत सुरू केले नाही तर टोल बंदचा इशारा दिला. यावेळी शिवसेनेचे डॉ अजिंक्य पाटील, सुधाकर पाटील, रणधीर पवार, धिरज बेळंबकर, डि के माने, अशोक मिरकले आदिसह शिवसेना पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.