

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : राज्य आणि केंद्र सरकारच्या विसंगत भूमिकांवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत जोरदार प्रहार करत हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. शेतकरी मदतीसंदर्भात सरकार खोटी व दिशाभूल करणारी उत्तरे देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी संसदेतील चर्चेत केला.
खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, "राज्य सरकार म्हणते आम्ही केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे, तर केंद्र सरकारचे मंत्री म्हणतात राज्याकडून प्रस्तावच आलेला नाही. लोकप्रतिनिधींना खोटी माहिती दिली जात असेल, तर हा स्पष्ट हक्कभंग असून जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे.
"महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकरी उध्वस्त झाल्याचे सांगत त्यांनी दोन्ही सरकारांवर शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. राज्य सरकारने विलंब केला आणि केंद्र सरकारने आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला, अशी टीका त्यांनी केली.
खासदार ओमराजे यांनी लोकसभेत तारांकित प्रश्नाद्वारे अतिवृष्टी नुकसान आणि केंद्रीय मदतीबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या उत्तरात धक्कादायक माहिती मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२५ मध्ये २६ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील तब्बल ७५.४२ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.
२२४ नागरिकांचा बळी गेला. केंद्र सरकारचे पथक ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान पाहणीसाठी आले होते. परंतु आजपर्यंत महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही औपचारिक मदत-विनंती पत्र प्राप्त झालेले नाही. या विसंगतीमुळे शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न अधिकच गंभीर झाला असून सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खा. राजेनिंबाळकर यांनी केली. "नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आणि पुरेशी आर्थिक मदत मिळाली पाहिजे. त्यांची थट्टा थांबवून प्रत्यक्ष मदत देणे ही सरकारची जबाबदारी असल्याची टिप्पणी त्यांनी या वेळी केली.