

BJP's undisputed dominance in Dharashiv district
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात नगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने बहुमताचा आकडा सहज पार करत सत्तास्थापनाचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने सर्वाधिक १९ जागा जिंकत पहिल्या क्रमांकावर मजल मारली असून, शिंदे शिवसेनेने १५ जागा मिळवत मजबूत साथ दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळवला आहे. ठाकरे शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नसून या पक्षाला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसची कामगिरीही मर्यादित राहिली असून तीन जागांवरच विजय मिळवता आला. दरम्यान, चार जागा जिंकत अपक्ष उमेदवारांनी सर्वांनाच चकीत केले आहे, तर समाजवादी पक्षाने एक जागा मिळवली आहे.
जिल्ह्यातील आठपैकी पाच तालुक्यांत भाजपने मोठे यश संपादन केले असून उर्वरित तालुक्यांतही पक्षाची कामगिरी लक्षणीय ठरली आहे. शिंदे शिवसेनेनेही अनेक ठिकाणी भाजपच्या बरोबरीने यश मिळवत महायुतीला बळ दिले आहे.
या निकालामुळे आजवर जिल्हा परिषदेत मर्यादित उपस्थिती असलेला भाजप थेट सत्तेत आला आहे. वर्षानुवर्षे सत्तेत सहभागी असलेली काँग्रेस यावेळी पिछाडीवर पडली आहे. या निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार तानाजी सावंत यांचे नेतृत्व यशस्वी ठरले, तर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांना अत्यंत मर्यादित यश मिळाले.
तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा प्रभावही पूर्वीइतका राहिला नसल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. या निकालानंतर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होणे निश्चित मानले जात असून, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
पक्षीय बलाबल असे
एकूण जागा ५५ असून यापैकी भाजप १९, शिवसेना १५, राष्ट्रवादी काँग्रेस ६, ठाकरे शिवसेना ७, अपक्ष चार, काँग्रेस ३, समाजवादी पक्ष १ अशा जागा मिळाल्या आहेत.