Dharashiv News : रुग्णालयातील रिक्त पदे भरा; बंद सुविधा सुरू करा

भूम : हृदयरोग तज्ज्ञांसह २४ तास अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी
Bhum Hospital Staff Vacancies
भूम ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासह बंद वैद्यकीय सुविधा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन देताना शहरातील पदाधिकारी व नागरिक.pudhari photo
Published on: 
Updated on: 

भूम : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा आधार असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे आणि बंद असलेल्या वैद्यकीय सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांबाबत भूम शहरातील पदाधिकारी व नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ग्रामीण रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून २४ तास अतिदक्षता विभाग सुरू करावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक प्राथमिक उपचार व वैद्यकीय सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने गंभीर रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Bhum Hospital Staff Vacancies
Beed Illegal Murum Mining : आनंदगावातील अवैध मुरूम उत्खननाला दणका

रुग्णालयातील डॉक्टर, तंत्रज्ञ आणि इतर आवश्यक रिक्त पदे तातडीने भरावीत, एक्स-रे सुविधा नियमित सुरू ठेवावी, विविध आजारांसाठी आवश्यक रक्त तपासण्यांची सोय करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. गंभीर रुग्णांसाठी आवश्यक मनुष्यबळ व उपकरणांसह अतिदक्षता विभाग सुरू करावा, तसेच गरोदर महिलांसाठी सोनोग्राफीची सुविधा नियमित उपलब्ध करून द्यावी, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

रुग्णालयातील बंद असलेल्या अन्य अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा तातडीने सुरू कराव्यात. कोणती पदे रिक्त आहेत आणि कोणत्या सुविधा बंद आहेत, याची माहिती संकलित करून वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा. तसेच या कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. साध्या तपासण्या व उपचारांसाठीही रुग्णांना खासगी रुग्णालये किंवा अन्य शहरांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधा सक्षम करून सर्वसामान्य रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Bhum Hospital Staff Vacancies
Jalna Accident : भरधाव पिकअपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपविभागीय अधिकारी भूम आणि तहसीलदार भूम यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी नगर परिषद बांधकाम सभापती, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अनिल दादा शेंडगे, ज्येष्ठ नेते दिलीप शाळू महाराज, शहराध्यक्ष अॅड. प्रकाश आकरे, नगरसेवक विठ्ठल बागडे आणि माजी नायब तहसीलदार हरिश्चंंद्र पवार उपस्थित होते.

मागण्यांची दखल न घेतल्यास ग्रामीण रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकारी व रहिवाशांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news