

केज : केज तालुक्यातील आनंदगाव शिवारात विनापरवानगी मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी चौघांना एकूण 23 लाख 44 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी जेसीबी मालक आणि एका ट्रॅक्टर मालकाने मिळून 15 लाख 47 हजार 400 रुपयांचा दंड भरला आहे. त्यामुळे संबंधित जेसीबी आणि एक ट्रॅक्टर मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तहसीलदार अशोक भंडारे यांनी ही माहिती दिली.
आनंदगाव येथील सर्व्हे क्रमांक 128 मध्ये विनापरवानगी 100 ते 120 ब्रास मुरूम उत्खनन करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. 28 सप्टेंबर रोजी तत्कालीन तहसीलदार भारत गंगावणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुरूम उत्खनन आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर पकडले होते. मंडळ अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा करून ही वाहने तहसील कार्यालयाच्या परिसरात जमा करण्यात आली होती.
या प्रकरणाचा अंतिम अहवाल अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्याकडे सादर करण्यात आला होता.या प्रकरणात जेसीबी मालक अंकित शरद चोपणे (रा. युसूफवडगाव), ट्रॅक्टर मालक अमर प्रकाश गायकवाड, दुसऱ्या विनानंबर ट्रॅक्टरचे मालक गणेश बापूराव राऊत (रा. आनंदगाव) आणि मुरूम उत्खनन करणारे ऋषिकेश तुकाराम कदम (रा. आनंदगाव) यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
संबंधितांनी उपविभागीय कार्यालयात लेखी खुलासे सादर केले. मात्र, हे खुलासे अमान्य करत 13 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी दंडात्मक कारवाईचे आदेश दिले.या आदेशानुसार जेसीबी मालक अंकित शरद चोपणे यांना 10 लाख 98 हजार 700 रुपये, ट्रॅक्टर मालक अमर प्रकाश गायकवाड यांना 4 लाख 48 हजार 700 रुपये, विनानंबर ट्रॅक्टरचे मालक गणेश बापूराव राऊत यांना 4 लाख 48 हजार 700 रुपये, तर मुरूम उत्खनन करणारे ऋषिकेश तुकाराम कदम यांना 3 लाख 48 हजार 700 रुपये असा एकूण 23 लाख 44 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दरम्यान, जेसीबी मालक अंकित चोपणे यांनी 10 लाख 98 हजार 700 रुपये, तर ट्रॅक्टर मालक अमर प्रकाश गायकवाड यांनी 4 लाख 48 हजार 700 रुपये बँकेत जमा केले. अशा प्रकारे एकूण 15 लाख 47 हजार 400 रुपयांचा दंड भरल्यानंतर संबंधित जेसीबी आणि एक ट्रॅक्टर मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले.
यासाठी दोन्ही मालकांनी संबंधित वाहने विकणार किंवा हस्तांतरित करणार नसल्याचे बंधपत्र व हमीपत्र दिले आहे.महसूल विभागाच्या या कारवाईमुळे विनापरवानगी गौण खनिज उत्खननाच्या प्रकरणात दंडात्मक कारवाईचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उर्वरित दंडाची वसुली आणि दुसऱ्या ट्रॅक्टरबाबत पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.