

भीमाशंकर वाघमारे
धाराशिव : दरवर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे शहरवासियांची घशाला कोरड पडण्याचा तो काळ होता. त्या वेळी राज्य सरकारने शहरासाठी उजनी धरणातून पाणी योजना मंजूर केली. मात्र काही लोकांच्या तक्रारींमुळे व त्रुटी निदर्शनास आल्याने ही योजनाच लटकली. ही बाब तेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कानावर घातली अन् त्यांनी फटक्यात योजना मंजुरीचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. परिणामी अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेली योजना मार्गी लागली, तत्कालिन उपनगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना ही आठवण सांगताना बुधवारी (दि. 28) गहिवरून आले.
अजितदादांचे जाणे राज्यासाठी मोठे नुकसानकारक असल्याचे सांगत मकरंद राजेनिंबाळकर यांनी अजितदादांच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, की धाराशिव शहरासाठी उजनी पाणीयोजना मंजूर झाल्यानंतर 2010 मध्ये शहरातील एका नगरसेवकाने तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. त्या वेळी या योजनेत काही त्रुटी असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
परिणामी ही योजनाच अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न होता. एकीकडे निदर्शनास आलेल्या योजनेतील त्रुटी अन् दुसरीकडे शहरात होत असलेले पाण्याअभावी नागरिकांचे हाल. या कोंडीतून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न होता. त्या वेळी मोठे संकट निर्माण झाले होते.
अखेर अनेकांचा विरोध असतानाही उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. अजितदादांकडे या फाईल्स घेऊन गेलो. त्यांनी भेटण्यास केबिनमध्ये बोलावले. विषय ऐकताच ते प्रचंड संतापले. त्यामुळे बाहेर आलो अन् सुनेत्रा आत्या यांना फोन लावून किस्सा सांगितला. त्यांनी पुन्हा अजितदादांना फोन करून मकरंद काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या, असा निरोप दिला. मग दुसऱ्या दिवशी अजितदादांनी बारामतीत बोलावले.
तिथे गेल्यानंतर त्यांना सर्व व्यवस्थित समजून सांगितले. यातील त्रुटी मग दादांच्या लक्षात आल्या. त्यांनी तातडीने नगरविकास विभागाच्या सचिवांना यात लक्ष घालण्यास सांगितले. दुष्काळी धाराशिवला मंजूर केलेली योजना अडचणीत यायला नको, असा संदेश दिला. त्यानंतर नगरविकास विभागाच्या सचिवांनी या फाईल्स मागवून घेत योजना मार्गी लावली. दादांच्या या निर्णयामुळे लटकलेली योजना मार्गी लागली.
भुयार गटार योजनेचे आश्वासन दादांचेच
दरम्यान, दुसरी आठवण सांगताना राजेनिंबाळकर म्हणाले, की 2011 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीवेळी प्रचारसभेत अजितदादांनी बार्शीनाका येथील सभेत धाराशिव शहरासाठी भुयारी गटार योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ते 2021 मध्ये पूर्ण झालेही. मात्र कोरोना संकटामुळे ही मंजूर योजना नियमांच्या कचाट्यात अडकली. त्या वेळी मी नगराध्यक्ष होतो. अर्थखात्याच्या मंजुरीशिवाय मोठ्या खर्चाच्या योजनांना निधी मिळणार नव्हता. परिणामी पुन्हा दादांची भेट घेतली नी त्यांनी 2011 मध्ये धाराशिवकरांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्या वेळीही दादांनी भुयारी गटार योजनेची फाईल तत्काळ क्लिअर केली.