

A young man poured diesel over himself in front of the police
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला कडेकोट पोलिस बंदोबस्त असतानाही दोन तरुणांनी पोलिसांना चकवा देत आंदोलन केल्याने जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर अभिजित देडे या तरुणाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर बापू साळुंके यांनीही आंदोलनाचा प्रयत्न केल्याने कार्यक्रमस्थळी एकच धावपळ उडाली. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ अभिजित देडे याने हे आंदोलन केले. विशेष म्हणजे मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करताना एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा तपासणी होत असताना संबंधित तरुणाच्या अंगावर डिझेल पोहोचलेच कसे, हा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. त्यानंतर दुसऱ्या तरुणानेही आंदोलनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांच्या गुप्तवार्ता यंत्रणेसह सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकाराची पालकमंत्री सरनाईक यांनी गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. एवढा मोठा पोलिस बंदोबस्त असतानाही अशी आंदोलने होतातच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकाराचा तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला. स्वातंत्र्यदिनासारख्या संवेदनशील राष्ट्रीय कार्यक्रमात सुरक्षा यंत्रणेला चकवा देत दोन आंदोलक आतपर्यंत पोहोचणे ही बाब केवळ बंदोबस्तातील त्रुटी दाखवून देत आहेत.
या प्रकारामागे नेमकी चूक कुठे झाली, गुप्तवार्ता यंत्रणेला आंदोलनाची पूर्वकल्पना होती का आणि तपासणी यंत्रणा अपयशी का ठरली, याची उत्तरे आता पोलिस प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.