

Tuljabhawani Temple Prasad : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री क्षेत्र माता तुळजाभवानी देवीच्या दर्शनाची आस मनात धरून दररोज राज्यभरातून हजारो भाविक तुळजापुरात येतात. आईच्या चरणी नतमस्तक होऊन कृतार्थतेचा भाव अनुभवतात. सोलापूर येथील कंटेट क्रिएटर गायत्री माने हिने नुकतंच तुळजाभवानी मंदिरातील दर्शनाने असाच कृतार्थ भाव अनुभवला. गायत्रीने तिचा भक्तिमय अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच मंदिरातील शिस्तबद्ध दर्शनव्यवस्था आणि विशेषतः प्रसादाची स्वच्छता व गुणवत्तेचे कौतुक केले आहे.
गायत्री माने हिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, "आई तुळजाभवानीच्या कृपेने मनोकामना पूर्ण झाल्याने तिचे आभार मानायला तुळजापूरला जाण्याचा योग आला. मंदिरात लाखो भाविकांची गर्दी असतानाही मंदिर प्रशासनाने दर्शनाची व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली होती. रांगेचे योग्य नियोजन, स्वच्छ परिसर आणि भाविकांच्या सोयीची घेतलेली काळजी यामुळे दर्शनाचा अनुभव अत्यंत सुखद झाला."
दर्शनानंतर मंदिरातून बाहेर पडताना तिने प्रसाद दालनातून लाडूचा प्रसाद घेतला. तिने या प्रसादाच्या दर्जाविषयी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "प्रसाद इतका छान, ताजा आणि स्वादिष्ट होता की पहिला घास घेताच मन प्रसन्न झाले. प्रसादाचे पॅकिंग अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटके होते. त्या पॅकवर उत्पादनाची माहिती, न्यूट्रिशन व्हॅल्यू, बॅच डिटेल्स, एक्सपायरी डेट आणि FSSAI लायसन्स नंबर स्पष्टपणे दिलेला होता. यावरून प्रसादाच्या गुणवत्तेची, स्वच्छतेची आणि अन्नसुरक्षेची मंदिर प्रशासनाने योग्य काळजी घेतल्याचे स्पष्ट दिसते."
प्रसाद म्हणजे फक्त गोडवा नाही, तर तो विश्वासाचा आणि परंपरेचा भाग असतो. श्रद्धेच्या ठिकाणी मिळणारा प्रसाद स्वच्छ, दर्जेदार आणि विश्वासार्ह असावा, हा मंदिर प्रशासनाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असेही गायत्रीने नमूद केले आहे.
श्री क्षेत्र तुळजाभवानी देवीच्या भक्तांना 25 जुलै 2025 पासून प्रसिद्ध 'चितळे बंधू' यांच्या लाडूचा प्रसाद दिला जात आहे. लाखो भक्तांच्या श्रद्धेचा आदर करत आणि त्यांना दर्जेदार अन्नसुरक्षा देण्याच्या उद्देशाने मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. या उपक्रमाला आता भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.