

वाशी: सोलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाशी तालुक्यातील पारगाव परिसरातील 'पृथ्वीराज बार अँड लॉज'वर धाराशिव पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) शुक्रवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ८ महिलांची सुटका करण्यात आली असून, लॉज मालक आणि मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
पारगाव परिसरातील या लॉजमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एएचटीयूचे (AHTU) पोलीस निरीक्षक श्री. मारुती शेळके यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले.
बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा
वरिष्ठांच्या निर्देशानुसार पोलिसांनी सापळा रचला. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती माधुरी मारकड, पोलीस उपनिरीक्षक श्री. सोनटक्के, महिला पोलीस अंमलदार पुरी, जाधव, दूधभाते, पोलीस नाईक श्री. माने आणि चालक यांच्या पथकाने एका बनावट ग्राहकाच्या मदतीने संपूर्ण कारवाईचे नियोजन केले.
शुक्रवारी (१४ ऑगस्ट) रात्री सुमारे ८:३० वाजता एएचटीयू पथकाने 'पृथ्वीराज बार अँड लॉज'वर अचानक छापा टाकला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे लॉजमध्ये एकच खळबळ उडाली. तपासणीदरम्यान तिथे वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवण्यात आलेल्या परराज्यांतील ८ महिलांची सुटका करण्यात आली.
लॉज मालक घुले आणि मॅनेजर शेट्टी हे एजंटच्या माध्यमातून परराज्यांतील महिलांना या ठिकाणी आणून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात संबंधित लॉज मालक व मॅनेजरविरुद्ध 'पीआयटी कायद्या'सह (ITP Act) भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका केलेल्या महिलांबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, वाशी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.