

नळदुर्ग, पुढारी वृत्तसेवा : उमरग्याहुन सोलापुरकडे जाणाऱ्या गाडीतुन १ कोटी ५ लाख ७८ हजार ८०० रुपयाचा गांजा राष्ट्रीय महामार्गवरील नळदुर्ग पोलिसांनी जप्त केला. सोलापुर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरून नेहमीच गांजासाह गुटख्याची कायम तस्करी सुरु असते. मंगळवारी (दि.३०) रात्री नऊच्या सुमारास नळदुर्ग पोलिसांची गस्त सुरु होती. यावेळी उमरग्याहुन सोलापुरकडे भरधाव वेगात जाण्याऱ्या (एमएच ०८ झेड ५६८४) चारचाकी पोलिसांनी अडवून त्यांची चौकशी करण्यात आली.
गाडी थांबल्यानंतर गाडीची तपासणी केल्यानंतर गाडीत मोठ्याप्रमाणात गांजा आढळून आला. यावेळी अतिष राजकुमार माने याला पोलिसांनी ताब्यात घेतली. चौकशीनंतर हा गांजा आपण सोलापुरला घेऊन जात असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्याच्याकडे चौकशी केले असता यामध्ये भीमराव दिलीप खडसुळे, राम दिलीप खडसुळे, डी. जे. चहाविक्रेता, कळवे, रवी (सर्व रा. सोलापुर) हे यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व आरोपीवर नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील अतिष राजकुमार माने याला अटक करण्यात आली आहे.
चारचाकीमधून पोलिसांनी एकुण ५२८ किलो गांजा जप्त केला आहे. गांजा आणि चारचाकी असा एकुण १ कोटी ५ लाख ७८ हजार ८०० रु्पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रीय महामार्गवर इतक्या मोठ्या किमतीचा गांजा पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कांगुने हे करीत आहेत. ही कारवाई नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कांगुने, सुरज देवकर आटुळे, पोलिस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, गिते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.