

47 kg of soybeans per hectare, hit by heavy rain
लोहारा, पुढारी वृत्तसेवा यावर्षी धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कसे कंबरडे मोडले आहे, याचे धक्कादायक वास्तव लोहारा तालुक्यातील भातागळी येथील एका पीक कापणी प्रयोगातून समोर आले आहे. दहा बाय पाच मीटरच्या चौरसातून केवळ २४५ ग्रॅम सोयाबीनचे उत्पादन निघाल्याने उपस्थित अधिकारी आणि शेतकरीही चक्रावून गेले. या आकडेवारीनुसार हेक्टरी केवळ ४७ किलो सोयाबीन उत्पादन होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, हे शेतकऱ्यांवरील आसमानी संकटाचे बोलके उदाहरण ठरले आहे.
सध्या जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२५ अंतर्गत खरीप पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. नवीन नियमांनुसार, ५०% नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर तर ५०% उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारावर निश्चित केली जाणार आहे. यामुळे या प्रयोगांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आयसी आयसी लोम्बार्ड पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री. बी. एन. बागल यांच्या उपस्थितीत वजनाची नोंद घेण्यात आली. या अत्यल्प उत्पादनामुळे शेतकऱ्यांना आता पीक विम्याच्या नुकसान भरपाईतून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.
यावेळी पीक विमा अभ्यासक व शेतकरी नेते अनिल जगताप (भातागळी), मंडळ कृषी अधिकारी एन. एन. मगर, उप कृषी अधिकारी जे. के. गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी के. एम. जाधव, जे. एस. पवार, व्ही. पवार, ग्रामपंचायत अधिकारी आर. आर. बोयने, महसूल अधिकारी एम. जी. माळी, सरपंच हनुमंत जगताप, ग्रामपंचायत सदस्य तानाजी आनंदगावकर, शेतकरी अमोल ओवंडकर, विश्वनाथ जगताप, वसंत गर्जे, राजेंद्र जगताप आणि शेतमालक शशिकांत कुलकर्णी उपस्थित होते.