

अब्बास सय्यद
भूम, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी खुले राहिले आहे. तर पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण खुले सुटले आहे. यामुळे राजकीय वातावरणात चांगलीच चुरस निर्माण झाली असून इच्छुक तयारीला लागले आहेत.
आरक्षण घोषित होताच सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केली असून अनेक तरुणांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. राहुल मोटे यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील समीकरणे नव्याने आकार घेत आहेत.
सध्या तालुक्यात ३ जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. पंचायत समितीवरही त्यांचे वर्चस्व आहे. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सत्तेत असल्याने त्यांची उमेदवारीची शर्यत ही तितकीच रंगतदार ठरणार आहे. भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व आमदार प्रा. डॉ. तानाजी सवंत या दोघांची मजबूत राजकीय पकड लक्षात घेता निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, सभापती प्रवीण देशमुख, संचालक विशाल ढगे, समाधान सातव, नीलेश चव्हाण आदींची टीम सज्ज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या इच्छुकांची संख्याही लक्षणीय आहे. ५० टक्के महिला आरक्षणामुळे ग्रामीण भागात महिला उमेदवार शोध मोहीम सुरू असून, अनेक ठिकाणी पतीदेवांचा राजकारणातील प्रभाव अद्याप टिकून आहे. मात्र बदलत्या काळात शिक्षित महिला जि.प. व पं.स. निवडणुकीत उतरतील, अशी अपेक्षा राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत ठरणार असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतर भूम तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे.