

Kadam Maharaj's hunger strike called off after discussions with Agriculture Minister Bharne
भूम, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दुधाला आधारभूत हमीभाव मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या सतीश कदम महाराज (आष्टा) यांच्या उपोषणाची आज सांगता करण्यात आली. प्रकाश बोधले महाराज यांच्या मध्यस्थीने आणि कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या चर्चेनंतर हा तोडगा निघाला.
गेल्या सात दिवसांपासून भूम येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कदम महाराज उपोषणास बसले होते. या काळात राज्यातील शेतकरी नेते राजू शेट्टी, तसेच वारकरी संप्रदायातील विशाल खोले महाराज यांच्यासह अनेकांनी उपोषण स्थळी भेट देऊन समर्थन दर्शवले होते. आज प्रकाश बोधले महाराज यांनी कृषिमंत्री भरणे मामा आणि कदम महाराज यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद घडवून आणला.
या चर्चेत राज्यात कर्जमुक्ती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सरसकट कर्जमाफीचा विचार केला जाईल, तसेच दुधाला हमीभाव निश्चित करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, असे कृषिमंत्री भरणे यांनी आश्वासन दिले. या सकारात्मक चर्चेनंतर कदम महाराजांनी उपोषण मागे घेतले. यावेळी उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे, तहसीलदार जयवंत पाटील, अॅड. विलास पवार, विठ्ठल बाराते, सुशेन जाधव, अरुण काकडे, तात्यासाहेब अष्टेकर, उद्धव राजे सस्ते यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.