

10 lakh devotees in Tuljapur for Kojagari
तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा आराध्य दैवत श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोमवारी (६ ऑक्टोबर) दुपारी १२.२४ वाजता पौर्णिमेचे पर्व सुरू होताच राज्यासह परराज्यातून लाखो भाविकांनी हजेरी लावत 'आई राजा उदो उदो'चा जयघोष करीत तुळजापूर पायीवारी पूर्ण केली.
श्री तुळजाभवानी मातेची पौर्णिमा मंगळवारी (७ ऑक्टोबर) साजरी होत आहे. देवीच्या पौर्णिमेसाठी किमान १० लाखांवर भाविक मातेच्या दरबारात दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सायंकाळी सोलापूच्या मानाच्या काठ्यांसह निघणाऱ्या मातेच्या छबिना मिरवणुकीनंतर अनेक श्रद्धाळू पौर्णिमेचा उपवास सोडतात. गुरुवारी सीमोल्लंघन सोहळ्यानंतर सुरू झालेली श्री तुळजाभवानी मातेची शारदीय नवरात्रौत्सवानंतरची श्रम निद्रा सोमवारच्या उत्तररात्री पूर्ण होऊन मूर्तीची मंगळवारी सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
पाच दिवसांनंतर मूर्तीला पंचामृत अभिषेक सुरू झाले. मातेच्या नित्य पूजेची घाट मंगळवारी सकाळी ६ वाजता होऊन मूर्तीला दुसऱ्यांदा पंचामृत अभिषेक सुरू करण्यात आले. या अभिषेकाच्या निमित्ताने हजारो भाविकांना थेट गाभाऱ्यातून दर्शन घेण्याचे भाग्य लाभले.