

तुळजापूर : कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा आई तुळजा भवानी च्या दरबारात साजरा करण्यासाठी राज्यासह परराज्यातून लाखों भाविक सध्या तुळजापूरच्या वाटेवर असून भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. शहरातले सर्व रस्ते लाकडी बॅरिकेड्स लावून बंद केल्याने तुळजापुरात सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली आहे.
दोन पौर्णिमांचा योगायोग चालून येत असल्याने भाविकांची गर्दी दोन टप्प्यात विभागली जात असून प्रशासनाचे नियोजन कोलमडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या महाराष्ट्र राज्यासह,कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलंगणा अशा विविध ठिकाणाहून लाखों भाविक मजल दर मजल करीत तुळजापूरची वाट चालत आगेकूच करताना दिसत आहेत. सोमावरी साडे 12 वाजता कोजगिरी पौर्णिमा महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्ती देवता श्री तुळजा भवानी मातेच्या तुळजापूर नगरीत कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा मंगळवारी साजरा होत आहे.
सोमवारी (6 ऑक्टोबर) दुपारी 12.24 वाजता पौर्णिमा प्रारंभ होत असून मंगळवारी (7 ऑक्टोबर) सकाळी 9.18 वाजता पौर्णिमा समाप्त होत आहे.मातेची निद्रिस्त मुर्ती सोमवारच्या उत्तररात्री मंगळवारी पहाटे सिंहासनाधिष्टित केल्यानंतर लगेच चरणतीर्थ, काकडा आरती पार पडून मातेला पंचामृत अभिषेक सुरू केले जाणार आहेत.दोन पौर्णिमेचा योग साधून आल्याने मंदीर व पोलीस प्रशासनाचा ताण यावर्षीही कमी होणार आहे.यंदा परतीच्या पावसाने ऐन शारदीय नवरात्रौत्सवात धुमाकूळ घातल्याने दहा दिवसात देवी दर्शनासाठी भाविकांची अपेक्षीत गर्दी दिसून आली नाही.परिणामी कोजागिरी पौर्णिमेला भाविकांची गर्दी प्रचंड उसळण्याची चिन्हे असून प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
गुरुवारी (2 ऑक्टोबर) सीमोल्लंघन सोहळ्यानंतर सुरू झालेली मातेची पाच दिवसाची श्रम निद्रा येत्या सोमवारी उत्तररात्री सहाव्या दिवशी संपणार आहे.मुख्य मुर्तीची सिंहासनावर पुर्नप्रतिष्ठापना होवून लगेच मूर्तीला पंचामृत अभिषेक सुरू होणार आहेत.मातेच्या नित्य पूजेची घाट मंगळवारी सकाळी 6 वाजता होऊन मुर्तीला दुसर्यांदा पंचामृत अभिषेक सुरू होत असून या अभिषेकाच्या निमित्ताने हजारो भाविकांना थेट गाभार्यातून दर्शन घेण्याचे सौभाग्य यंदा लाभणार आहे.त्यानंतर मातेच्या शोड्षोपचार पूजेदरम्यान भाविकांना (महावस्त्रालंकार, नैवेद्य, धुपारती, अंगारा) धर्म दर्शन व मुख दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.