

Youth swindled of ₹21 lakh by man claiming connections with ministers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुरवठा विभागात निरीक्षक पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून, तसेच मंत्र्यांशी आपले जवळचे संबंध असल्याची थाप मारून विद्युत विभागातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात पुणे येथील एका भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक अजय सावरीकर (रा. मॉडर्न कॉलनी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी संदीप काळुसे (३१, रा. किनगाव राजा, जि. बुलढाणा) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी अभिषेक सावरीकर याची २०२३ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. अभिषेकने आपले राज्यातील अनेक मंत्र्यांसोबत लागेबांधे असल्याचे भासवले. याचाच फायदा घेत त्याने संदीप यांना सरळसेवा भरतीअंतर्गत अन्न व नागरी पुरवठा विभागात 'पुरवठा निरीक्षक' या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.
या कामासाठी त्याने तब्बल २१ लाख रुपयांची मागणी केली. नोकरीच्या आशेने संदीप यांनी सुरुवातीला १ लाख रुपये 'फोन पें' द्वारे आरोपीला पाठवले. त्यानंतर ५ जून आणि २० जून २०२४ रोजी कॅनॉट प्लेस परिसरातील महाराणा प्रताप उद्यान गेटसमोर दोन टप्प्यांत तब्बल २० लाख रुपये रोख स्वरूपात दिले. तपास सपोनी योगेश गायकवाड हे करत आहेत.
सासुरवाडीच्या नावे मारली थाप
आरोपीने स्वतःला खूप मोठा माणूस असल्याचे भासवले होते. तो पुण्याचा असूनही वारंवार शहरात कसा येतो, असा प्रश्न फिर्यादी संदीप यांना पडला होता. त्यावर 'माझी सासुरवाडी याच शहरात असल्याने माझे कामानिमित्त येणे-जाणे असते. माझे वारंवार येणे होणार नाही, त्यामुळे लवकर पैसे दे आणि मोकळा हो, म्हणजे मी तुझे पुढचे कामही मार्गी लावेन', अशी भुरळ घालत त्याने थाप मारली होती.
बनावट नियुक्तीपत्र अन् थेट धमकी
परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यात संदीप यांचे नाव आले नाही. त्यामुळे त्यांनी आरोपीकडे विचारणा करत पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपीने चलाखी करत समाज कल्याण विभागाच्या 'कनिष्ठ लिपिक' पदाचा आणखी एक बनावट नियुक्ती आदेश दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तरीही संदीप यांनी पैशांसाठी तगादा लावल्याने संतापलेल्या आरोपीने, "तुला माहीत नाही मी कोण आहे, तुला कुठेही गायब करून टाकीन," अशी थेट धमकीच दिली.