

वाळूज महानगर : चौघा जणांनी एका ३१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना रविवारी (दि.४) रात्री तीसगाव हद्दीत पंढरपूर जवळील अब्बास पेट्रोल पंपासमोर घडली. अमोल एकनाथ बारे (३१, रा. बकवालनगर, वाळूज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल आई-वडिलांसोबत वाळूज जवळील नायगाव-बकवालनगर येथे राहत असे. दोन-अडीच वर्षांपूवी अमोलचे लग्न झाले. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच त्याची पत्नी माहेरी निघून गेली आहे.
रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अमोल घराबाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कमळापूर येथील इज्तेमा बंदोबस्त संपल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शेख सलीम, जमादार सय्यद चाँद, पोलिस अंमलदार शेख युसूफ हे शहरात घराकडे जात असताना त्यांना पंढरपूर जवळील अब्बास पेट्रोल पंपासमोर तीन ते चार अनोळखी तरुण एकास मारहाण करताना दिसून आले.
दरम्यान, पोलिसांना पाहून मारहाण करणारे ते चौघे जण तेथून दोन दुचाकीवरून पसार झाले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाच्या छातीवर, गळ्यावर चाकून भोसकल्याचे व्रण दिसून आले.
माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, उपनिरीक्षक विनोद अबुज यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. भागिरथी पवार, पोलिस उपनिरीक्षक वाघ यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
यावेळी पोलिसांनी अमोल यास बेशुद्धावस्थेत उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी अमोल यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जमादार सय्यद चाँद यांनी दिलेल्या फियीदीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात चार अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.