

Youth kidnapped from Calda Corner in Scorpio
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून छत्रपती संभाजीनगर येथे आलेल्या एका तरुणाचे काल्डा कॉर्नर परिसरातून स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि. २४) रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. पैशांच्या वादातून हा T प्रकार घडला असून, याप्रकरणी अक्षय वाघ (रा. जालना) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जयेश बाफना (रा. पुणे) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
फिर्यादी राजेश सुभाषचंद बाफना (५६, रा. व्यंकटेशनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा जयेश हा सोमवारी (दि. २३) रात्री साडेआठच्या सुमारास पुणे येथून कारने (एमएच-१२-डब्ल्यूजे-६४०१) मित्र योगेश मुंडे, अक्षय मुंडे आणि चालक गणेश जाधव यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगरकडे निघाला होता. मंगळवारी मध्यरात्री २:३० वाजता ते काल्डा कॉर्नर येथे पोहोचले.
तेथे आधीच उभ्या असलेल्या कारमधील दोघांशी जयेश बोलत उभा होता. त्यावेळी तेथे स्कॉर्पिओ (एमएच-२०-७०७१) आली. त्यातून उतरलेल्या दोघांनी जयेशला गाडीत बसून बोलू असे म्हटले, तर सोबत आलेल्या चालकाला आमच्यात पैशांचा व्यवहार आहे, तुम्ही आता निघा असे सांगून जयेशला बळजबरीने गाडीत बसवून नेले.
मित्रांनी पोलिसांना माहिती दिली. काही वेळाने जयेशने मित्र योगेशला कॉल करून आपण अक्षय वाघ सोबत पुण्याला परत जात असून पैशांचा व्यवहार आपसांत मिटवणार असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अक्षयला गाडीचा क्रमांक व फोटो पाठवण्यास सांगितले. मात्र त्याने दोघांचे मोबाईल बंद केले. पहाटे राजेश यांनी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी उपनिरीक्षक किरण बोराडे यांच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. आरोपीचे लोकेशन अहमदपूर, लातूर येथे आल्याने पथक तिकडे गेले-