

Leopard terror; pounces on a two-wheeler rider
गंगापूर, पुढारी वृत्तसेवाः गोदावरी नदीकाठच्या नेवरगाव परिसरात बिबट्याच्या वावराने शेतवस्त्यांवरील नागरिकांची झोप उडाली आहे. मंगळवारी (दि. २४) रात्री शेतवस्तीवर मोटारसायकलवरून जात असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात कैलास संपत डवले (वय ४६, रा. जुने नेवरगाव) यांच्या चेहऱ्यावर बिबट्याचा पंजा लागून ते जखमी झाले. सुदैवाने त्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास कैलास डवले हे गट क्रमांक ४३० मधून मोटारसायकलवरून शेतवस्तीवरील घराकडे जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याचा पंजा चेहऱ्यावर लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नखांचे ओरखडे पडले. हल्ल्यानंतर बिबट्या अंधारात पसार झाला. डवले यांच्यावर नेवरगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.
१० दिवसांत दुसरा हल्ला
याच परिसरात दहा दिवसांपूर्वी, १५ नोव्हेंबर रोजी रात्री २.४५ वाजता आकाश बन्सीलाल गहिरे यांच्या गट क्रमांक ५३९ मधील शेतवस्तीवर बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला होता. हा प्रकार शेतवस्तीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. थेट शेतकऱ्यावर हल्ला झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.